जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुन्या व झुकलेल्या अवस्थेत असलेल्या वृक्ष उन्मळून पडण्या अगोदर मनपाने छाटणी करून त्यांना जीवनदान द्यावे, अशी मागणी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने अॅड. जमील देशपांडे यांनी केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी झाडं इमारतीमुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतात. पर्यायाने त्यांचा तोल जात असतो. अशा वेळी पावसाळ्यात वादळं आल्यास सदर ५० ते १०० वर्षांची महाकाय वृक्ष उन्मळून पडल्याने बहुमूल्य झाडाचे व पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे मनपाने लाईट विभागाची शिडी असलेल्या गाडीवर मजूर लावून झाडांची छाटणी करून संतूलन केले तर होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका दर वर्षी अशी उपाययोजना करीत असते. महाराष्ट्रातील जळगाव मनपा अग्रगण्य समजली जाते. तसेच आयुक्त, महापौर, व सर्व नगरसेवक हे पर्यावरण प्रेमी आहेत. तरी त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे मराठी प्रतिष्ठानने केली असून महानगरपालीकेतर्फे पोकलॅनने हे काम करावे, अशी सूचना देखील केली आहे.