आडगाव ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील हुतात्मा स्मारक व ग्रामपंचायत कार्यालयात आज क्रांती दिनाच्या निमित्ताने हुतात्मे भगवान भूसारी, शामराव पाटील त्र्यंबक वाणी यांच्यासह ३० स्वातंत्र सैनिकांनी ९ ऑगस्ट १९४२ क्रांतीत इंग्रजांना चोख उत्तर दिले व आपल्या जीवाची परवा न करता जीवाची आहुती दिली म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र सैनिकांचे वारसदार नामदेव कौतीक पाटील यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हयात फक्त दोन हुतात्मा स्मारक आहेत. त्यापैकी आडगाव एक आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुनिल भील उपसरपंच दिलीप पवार, हुतात्म्यांचे वारसदार डॉ. प्रविण वाघ, स्वातंत्र सैनिक वारसदार शांताराम पवार, सामाजिक कार्यकर्ते सुदाम पाटील, भगतसिंग पाटील, ग्रा.प. सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळ स्वातंत्र सैनिक वारसदार, विदयार्थी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका’ आशा सेविका, आरोग्य सेविका, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाटील यांनी या दिनानिमित्त गावातील एमपीएससी परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी दहा हजार रूपयांची पुस्तके खरेदी करून देणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा प सदस्य प्रल्हाद पाटील यांनी तर मनोगत दिलीप पवार व नामदेव पाटील यांनी व्यक्त केले. गावकऱ्यांनी या गावाच्या हुतात्म्यांची नावे व स्वातंत्र सैनिकांची नावे इतिहासात नोंद व्हावी. शासनाने या बाबतीत दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.