मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आणि भाजप (Shivsena vs bjp) यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) नवीन दावा केला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अडचण होत आहे. संघाच्या दादर शाखेने शिवाजी पार्क येथे शाखा भरवण्यासाठी वेगळा भूखंड देण्याची मागणी महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेनं १९६७ सालापासून संबंधित भूखंड संघाला भाडेतत्वावर दिला होता. संघानं २००७ पर्यंत या भूखंडाचं भाडं भरलंय. या भूखंडावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे. दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत असल्यामुळे संघाची शाखा भरविण्यात अडचण येत आहे, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये पर्यायी मोकळा भूखंड संघाला देण्यात यावा, अशी मागणी संघानं केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
शिवाजी पार्कमधील १७५५ चौरस मीटर मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा १९६७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे.
संघाने १९६७ पासून २००७ पर्यंत मोकळ्या भूखंडाचे भाडे भरलेले आहे.
२००८ पासून आरेखन न झाल्यामुळे प्रशासकीय कामामुळे भूभाडे थकीत
आरेखन करण्यासाठी आग्रह धरूनही आजपर्यंत आरेखन केलेलं नाही.
१९३६ पासून शिवाजी पार्क मैदानात आरएसएसच्या दैनंदिन शाखा
सध्या या भूखंडावर स्मृतीस्थळ असल्यामुळे संघाच्या ताब्यातील भूखंडावर उपक्रम राबविण्यास अडचण, असा दावा संघाने केला आहे.
शिवाजी पार्क मैदानाजवळच्या नाना नानी पार्कजवळचा मोकळा भूखंड आरएसएसला द्यावा, अशी मागणी.