चाळीसगाव (प्रतिनिधी) लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना भगवान महावीर यांच्या शिकवणीनुसारच काम करत असल्याचा मला अभिमान असल्याचे प्रतिपादन आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. ते चाळीसगावातील भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित महोत्सवात बोलत होते.
भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक अर्थात भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने आज चाळीसगाव येथील सकल जैन समाजाच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवाला आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भेट देऊन सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व संवाद साधला. यावेळी मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, भगवान महावीर स्वामींनी अहिंसा, अपरिग्रह, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पाच महाव्रतांचा प्रचार केला. त्यांनी प्राणिमात्रांवर दया दाखवण्याचा आणि सर्व जीवांचा आदर करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणींनी समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि नेहमीच त्यांचे विचार जगभरातील लोकांना प्रेरणा देत राहतील, असेही आमदार श्री. चव्हाण म्हणाले.














