कजगाव ता. भडगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या वाघळी शिवारात २५ मेंढ्या उष्माघाताने मृत्यू पावल्याने मेंढपाळ कुटूंबीयांना अश्रू अनावरण झाले होते.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर राहणार जामधरी ता. नांदगाव यांचा मेंढ्यांचा वाडा दाखल झाला आहे. दि. २५ रोजी मेंढ्या चराईसाठी वाघळी शिवारात आले असता दि. २५ रोजी दुपारी एक वाजे नंतर एका मागून एक करत मेंढ्या कोसळू लागल्या त्यात उष्माघाताने २५ मेंढयाचा मृत्यू झाल्याने सदर प्रकार पाहून संपुर्ण मेंढपाळ कुटूंब भयभीत झाले आहे.
वाढलेल्या उष्णतेमुळे किंवा उन्हाचा फटका बसल्यामुळे तसेच मेंढ्यांना तापलेल्या उन्हात पाणीच मिळाले नसल्यामुळे पंचवीस मेंढ्याचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा होतांना दिसून आली. यामुळे मेंढपाळ यांचे अंदाजे २ ते ३ लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेने चाळीसगाव तालुकासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेमुळे मेंढपाळाचे अश्रू अनावरण झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाअध्यक्ष पोपट भोळे, मल्हार सेनेचे नाशिक विभाग अध्यक्ष गणेश जाने, ह.भ.प. संदिप महाराज, हनुमंत बोरसे व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सपकाळ, वाघळीचे तलाठी शेळके यांनी पंचनामा केला आहे.