जळगाव (प्रतिनिधी) मामाच्या शेताचा व्यवहार केल्याचा वाईट वाटल्याने नरेंद्र वाल्मिक सोनवणे व त्यांचे मित्र या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. ३ रोजी सायंकाळच्या सुमारास उमाळा येथील कंडारी फाट्याजवळील पेपरमील समोर घडली. याप्रकरणी संशयित रविंद्र कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कंडारी येथील नरेंद्र सोनवणे हे शेती करतात. दि. ३ रोजी संशयित रविंद्र कोळी (रा. कांचन नगर) याने कंडारी फाट्याजवळल पेपर मिलजवळ नरेंद्र सोनवणे यांना थांबवले. त्याठिकाणी त्याचे मामा बाजीराव नारायण कोळी यांच्या शेताचा व्यवहार तुम्ही केला. या कारणावरुन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्या हातावर आणि पायावर मारुन जखमी केले. यावेळी त्यांचे मित्र कैलास रिवाजकर हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना देखील मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांच्या (एमएच १९, बीडी ००२३) क्रमांकाच्या दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. दरम्यान, नरेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविंद्र कोळी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहे.