हिंगोली (वृत्तसंस्था) चतुर्थीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा येथील सत्य गणपतीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. ३१) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नांदेड ते हिंगोली रस्त्यावरील दाती शिवारात घडली. गजानन देवराव काळे ( वय ३६) व दयानंद बाबुराव निर्मल वय ३३), असे मयत भाविकांचे नावे आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात असलेल्या मरडगाव येथील भाविक गजानन देवराव काळे, दयानंद बाबूसराव निर्मल, पांडुरंग किसनराव काळे, मंगेश चंपतराव झांबरे (सर्व रा. मरडगाव ता. हादगाव ) आणि सखाराम दगडू शिंदे (वय ३५, रा. आखाडा बाळापूर) हे पाच भाविक १ नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा येथील सत्यगणपती दर्शनासाठी मरडगाव येथून ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पायी निघाले होते.
रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ( नांदेड ते हिंगोली रोडवरील दाती शिवारामध्ये हे भाविक आले असता ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३८ व्ही ७११६ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून भाविकांना धडक दिली. यातील गजानन काळे व दयानंद निर्मल हे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. अन्य तीन भाविक गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. ट्रॅक्टर चालकांवर विविध कलमान्वये आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख माजिद करीत आहेत. दोन्ही मयत एका गॅस एजन्सीवर काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.