जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथून जळगावला आलेल्या तरुणीचा मोबाईल हिसकावून मोटार सायकलने पळ काढणा-या तिघांपैकी दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी अटकेतील दोघां संशयित आरोपींना रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नवी मुंबई येथील तरुणी आपल्या मैत्रीणीसह एमपीएससीच्या क्लाससाठी जळगाव येथे रहात होती. ती आपल्या मैत्रीणीसह मोबाईलवर बोलत पायी चालत असतांना तिघा चोरट्यांनी भरधाव मोटार सायकलवर येत मोबाईल हिसकावून पलायन केले होते. त्यात तरुणी खाली पडून जखमी झाली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. त्यानुसार विशाल दिनकर सपकाळे (शास्त्रीनगर, जामनेर) आणि आकाश कडु आल्हाट (रा. शिवाजीनगर, जामनेर) अशा दोघांना अटक करण्यात आली. तर त्यांचा तिसरा साथीदार योगेश सोनार (रा. जामनेर) हा फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. दुसरीकडे योगेश सोनार याच्या मदतीने हा मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचे दोघांनी कबुल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ. सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप साबळे, पोना विजय पाटील, पोना अविनाश देवरे, पोना नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, पोकॉ. सचिन महाजन, पोना किरण धनगर आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी परिश्रम घेतले.