चाळीसगाव ः चाळीसगाव शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. भाग्यवान उर्फ माया लक्ष्मण गायकवाड (24, चिकुंदरा, ता.तुळजापुर, जि. उस्मानाबाद) व विकास संपत म्हस्के (25, बालाजी नगर, आशा टेलरसमोर, भोसरी, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पेट्रोलिंग दरम्यान कारवाई
चाळीसगाव पोलीस 3 रोजी मध्यरात्री रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असताना चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनच्या जवळच रोडवर दुचाकीवरून जाताना दोघा संशयीतांना पकडण्यात आले. संशयीताकडून गावठी बनावटीच्या दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस, दोन मॅगझिन, पल्सर मोटारसायकल (क्रमांक एम.एच.25 ए.झेड.6186) असा एकूण एक लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी भाग्यवान लक्ष्मण गायकवाड उर्फ माया हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात तुळजापूर, नळदुर्ग व लोणी काळभोर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.
यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, फौजदार योगेश माळी, एएसआय विश्वास पाटील, एएसआय शशिकांत महाजन, चालक हवालदार नितीन वाल्हे, हवालदार विनोद भोई, चत्तरसिंग महेर, आशुतोष सोनवणे, रमेश पाटील, समाधान पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.