चोपडा (प्रतिनिधी) जीममधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसने धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले. ही घटना चोपड्यानजीक गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. रूपेश तुळशीराम कोळी (१७) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर भावेश मोहन सोनवणे (१७) आणि साहिल शकील पिंजारी (१९, तिघे रा. चहार्डी, ता. चोपडा) हे जखमी झाले आहेत
तालुक्यातील चहार्डी येथील इयत्ता नववीतील दोन विद्यार्थी व उच्च शिक्षण घेणारा एक असे तीन विद्यार्थी जिम (व्यायाम) करून घरी परत जात असताना जुना चोपडा-शिरपूर रस्त्यावर अजिंक्य लॉन्स समोर त्यांच्या दुचाकीला बसची धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील तिघा मित्रांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना चोपडा शिरपूर रस्त्यावर अजिंक्य लॉन्स जवळ सकाळी सात वाजेच्या सुमार घडली.
या अपघातात चहार्डीच्या माजी सरपंच संगीताबाई कोळी व विद्यमान उपसरपंच तुळशीराम कोळी यांचा धाकटा मुलगा रुपेश (वय १५) हा ठार झाला असून त्यांच्या सोबतीचे भावेश सोनवणे व साहिल शकील पिंजारी हे दोन्ही गंभीर जखमी आहेत. साहिल पिंजारी हा चोपडा महाविद्यालयात एफवायमध्ये तर भावेश हा गावातील शा.शी. पाटील विद्यालयात नववीत शिकत आहे. तर मयत देखील शा. शी पाटील माध्यमिक विद्यालयाचा नववीचा विद्यार्थी होता. दरम्यान मृतावर दुपारी बारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या परिवाराने एकच टाहो फोडला होता. त्याच्या अंत्ययात्रेत तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे गावात अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
















