जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरट्यास अटक शिताफीने अटक केली आहे. फैय्याज शकुर मनोवार (रा. दोंडाईचा, जि. धुळे), असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
दोंडाईचा येथील रहिवासी मात्र जळगावच्या सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या फैय्याज यास कोणताही कामधंदा नसतांना तो चोरीच्या मोटार सायकली वापरत असल्याची गुप्त माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले पथक पुढील तपासकामी रवाना केले होते. त्याच्या मागावर असलेल्या पथकाने शोध घेऊन देखील तो हाती लागत नव्हता. फैय्याज मनीयार हा जळगाव शहरात असल्याची माहिती समजताच पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल करत चोरीच्या पाच मोटार सायकली पोलिसांना काढून दिल्या. संशयित फैय्याजला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
















