जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान फाऊंडेशनतर्फे जागतिक अपंग दिवस सप्ताहनिमित्त आठवडाभर विविध उपक्रम राबवित दिव्यांगांना आनंद देण्याचा प्रयत्न केला.
जागतिक अपंग दिवस सप्ताहची सुरुवात दि.३ डिसेंबर रोजी दिव्यांग मुलांच्या हस्ते केक कापून आणि त्यांना अल्पोहार देऊन करण्यात आली. उडानच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात दिवसभरात नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर राबविलेल्या स्पर्धेच्या शेवटी पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा उपायुक्त शाम गोसावी होते. तसेच डॉ.निलीमा सेठिया, दिलीप गांधी, शालीग्राम भिरूड, निशा पाटील यांनी उपस्थिती देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
उडाण दिव्यांग प्रशिक्षण संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आठवडाभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चित्रकला स्पर्धा, बदली बॉल, आंधळी कोशिंबीर, जनरल नॉलेज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात दिव्यांगासाठी शासनाने राबवलेल्या योजनांची पालकांना माहिती देण्यात आली तसेच त्यांच्याकडून काही योजनांचे अर्ज देखील भरून घेण्यात आले. आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी चांगलीच धमाल केली. प्रत्येक स्पर्धेचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला. सप्ताहाचा समारोप दि.९ रोजी करण्यात आला. प्रसंगी स्पर्धेतील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रेस भेट देण्यात आला.
दिव्यांग सप्ताह उपक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, जयश्री पटेल, सोनाली भोई, अनिता पाटील, चेतन वाणी तसेच धनराज कासट यांनी विशेष परिश्रम घेतले. दिव्यांग मुलांना त्यांचे हक्क मिळावे आणि त्यांना देखील सर्वसामान्यांप्रमाणे आनंद व्यक्त करता यावा यासाठी नेहमी उपक्रम राबविणार आहे. दिव्यांगांच्या हितासाठी इच्छुक असलेल्यांनी तसेच समाजकार्याची आवड असलेल्या व्यक्तींनी उडानसोबत जुळावे असे आवाहन हर्षाली चौधरी यांनी केले आहे.