मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार नसून मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत पार पडेल. मात्र, दुसरीकडे मेळाव्याला शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, कदमांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही चांगलेच संतापले असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झालीय. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. सामान्य शिवसैनिकांना या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यात शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार का नाही याबद्दल अनेक चर्चा आहेत.
‘त्या’ ऑडिओ क्लिपची शहानिषा करुन कदमांवर कारवाई?
माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत होते. मात्र यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यात आता दसरा मेळावा आहे. यावेळी रामदास कदम यांना बोलावलं नसेल अशी देखील चर्चा सुरू आहे.
रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशा प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदमांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांनाही आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला रामदास कदम यांना इंट्री नसेल असही काही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.