मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेत अचानक झालेल्या बंडामुळे रातोरात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. मात्र, हे सगळं एका रात्रीत घडलं नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबद्दल संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता, असा खुलासा देखील या मुलाखतीतून करण्यात आला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड करुन महिना उलटला त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुलाखत संजय राऊतांनी घेतली आहे. 26 आणि 27 जुलैला म्हणजेच, आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शित होणार असून सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरं मिळतील असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, की खूप वेदनादायी आहे तो प्रकार. मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं.
सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती.
ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात. दरम्यान, विश्वासदर्शक ठराव, मुंबईचा घात? मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचे आक्षेप, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांच्या थेट प्रश्नांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. एवढेच नव्हे तर उद्याच्या भागात उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.