नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास तासभर युतीबाबत चर्चा झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला.
दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत संसदेत शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती दिली. यावेळी शिंदेंनी शिवसेनेचे मुख्य गटनेता अशी ओळख करुन दिलेल्या राहुल शेवाळेंनी ठाकरेंच्या वक्तव्यांचा पाढाच वाचला. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गेल्यावर्षी जून महिन्यात दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणही सोबत होते. पण उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे वेळ मागितली आणि एक तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार फुटले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी खासदारांना माझ्याकडून युतीचे सर्व प्रयत्न करुन झाले आता तुम्ही करा, असं सांगितल्याचा मोठा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.
ज्यावेळी आमदारांनी ही भूमिका घेतली तेव्हा सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलावलं होतं. त्या दिवशी सर्व खासदारांनी सांगितलं की आम्ही पक्षासोबतच राहू, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की दोन अडीच वर्ष आम्हाला खूप त्रास होत आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमची भूमिका मान्य केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं, की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर निश्चितपणे मी ती भूमीका स्विकारेन आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करेन, त्या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंतही उपस्थित होते. या सर्वांसमोर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले आणि भाजपने तसा निर्णय घेतला असेल तर त्याचं मी स्वागत करेन त्यामुळे त्या भूमिकेशी आम्हीही सहमत झालो, पण ज्यावेळी दुसरी बैठक झाली त्यावेळीही असं ठरलं की 2024 ची निवडणुकी लढवायची असेल तर युती करणं महत्त्वाचं आहे. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला वांरवार हेच सांगितलं की महाविकास आघाडीसोबत आपण येणारी निवडणूक लढवूया पण आम्ही विरोध दर्शवला.
प्रत्येक खासदाराने लोकसभा मतदार संघातील अडचणी अरविंद सावंत यांना सांगितल्या, अरविंद सावंत यांनीही ही भूमिका मान्य करुन उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली. उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी युतीसाठी प्रयत्न झाले पण भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याने ती गोष्ट तेव्हा घडू शकली नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. माझ्या परिने मी युतीचे सर्व प्रयत्न केले. आता तुम्ही देखील प्रयत्न करा. त्यानंतर मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.