जळगाव (प्रतिनिधी) मनपाकडून शहरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरणाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शासकीय प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम घेण्याबाबत शासनाचे महापालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यासाठी तारीख आणि वेळ मिळत नाही, तोपर्यंत सदर पुतळयांच्या अनावरणाबाबतचे इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे शासकीय आदेशात म्हटले आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे) एकूण ४० नगरसेवकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत कार्यक्रम करण्याची आग्रही मागणी लेखी स्वरूपात केल्यामुळे मनपाकडून शहरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरणाचा वाद थेट मंत्रालयात पोहचला होता. यानंतर मनपाने या संदर्भात नगरविकास विभागाचे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार आलेल्या मार्गदर्शनानुसार उभारणी केलेल्या पुतळयांचे राजशिष्टाचार पध्दतीने व शासकीय नियमानुसार अनावरण करावयाचे असल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आमंत्रीत करण्यासाठी दिनांक व वेळ मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयास सादर करण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यासाठी तारीख आणि वेळ मिळत नाही, तोपर्यंत सदर पुतळयांच्या अनावरणाबाबतचे इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे आदेश प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते ठरलेल्या दिवशी होईल, अशी भूमिका ठाकरे गटासह मराठा संघटनानी घेतला आहे. तर पुतळ्याचे अनावरण हे ठरल्याप्रमाणेच होईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सकाळी ११ वाजता जळगावात आगमन होईल. ते प्रथम मनपातील पुतळ्याचे अनावरण करतील त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील व त्यानंतर पक्षाची सभा होईल असे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले आहे.