मुंबई (वृत्तसंस्था) उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमण आणि औद्योगिक, नागरी वसाहतीतील दूषित पाणी नदी पात्रात मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत उपाययोजनात्मक चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक पार पडली.
उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी, नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी. नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने मदत केली जाईल.
एनआरसी कंपनीने या परिसरात उभारलेला बंधारा जीर्ण झाला असल्याची माहिती या बैठकीत मिळाली. हा बंधारा संपादीत करुन त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. यावेळी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसह, सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली, नितीन निकम, उमेश बोरगावकर, कैलास शिंदे उपस्थित होते.
















