नवी मुंबई (वृत्तसंस्था) मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणी परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. रविशंकर यांनी ठाकरे सरकारला थेट सवाल विचारला असून ते म्हणाले की, सचिन वाझे कोणाच्या दबावात आले? शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या?.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे. यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आज केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “भ्रष्ट्राचाराचं प्रकरण नाही, हे ऑपरेशन लूट आहे. ते म्हणाले की, खंडणी घेणं हा गुन्हा आहे आणि जर याप्रकरणी शरद पवार यांना माहिती दिली जात आहे तर प्रश्न हा उपस्थित होतोय की, शरद पवार जर सरकारमध्ये नाहीत, तर मग त्यांना कोणत्या आधारावर माहिती दिली जात आहे. तसेच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की, शरद पवार यांनी या प्रकरणासंदर्भात आपल्या स्तरावर कोणती कारवाई केली?”
रवीशंकर म्हणाले की, “शरद पवारांच्या शांततेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचसोबत उद्धव ठाकरेही शांत आहेत. सचिन वाझे यांची पात्रता एएसआयची असूनही त्यांना क्राईम सीआयजीचा चार्ज देण्यात आला आहे. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “एकीकडे मुख्यमंत्री सचिन वाझे यांना पाठीशी घालतात, तर दुसरीकडे होम मिनिस्टर म्हणतात, मला 100 कोटी आणून द्या. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्यानं आणि इमानदारीनं चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच याप्रकरणाची स्वतंत्र एजन्सीकडून चौकशी होणं गरजेचं आहे, कारण यामध्ये शरद पवार, मुंबई पोलीसांची भूमिका समोर येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाही अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.”