जळगाव (प्रतिनिधी) दिवाळी असल्याने घरातील बाल्कनीत आकाशकंदील लावताना तोल जाऊन पडल्याने कृषी पर्यवेक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मोहाडीरोडवरील नित्यानंद सोसायटीमध्ये घडली. उल्हासराव चंद्रराव पाटील (वय- ५२), असे मयताचे नाव आहे.
तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळले !
भडगाव तालुक्यातील गिरड येथील उल्हासराव पाटील यांच्या पत्नी आणि ते जळगावात नोकरीला आहे. त्यामुळे ते आपल्या दोन्ही मुलांसह शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर कुटुंबियांसह वास्तव्यास होते. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते. दिवाळी असल्याने पाटील कुटुंबिय घराची साफसफाई करीत होते. उल्हासराव पाटील हे घराच्या बाल्कनीमध्ये साफसफाई केल्यानंतर आकाशकंदील लावताना त्यांचा पाय घसरुन तोल गेला. त्यामुळे ते थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरातील नागरिकांनी केले रुग्णालयात दाखल !
उल्हासराव पाटील हे तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याची कळताच परिसरातील नागरिकांनी सोसायटीच्या परिसरात धाव घेतली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या पाटील यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले.
नातेवाईकांचा मनहेलावणारा आक्रोश !
घटनेची माहिती मिळताच उल्हासराव पाटील यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांना मयत घोषीत करताच त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. भडगाव तालुक्यातील गिरड येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.