जळगाव / नंदुरबार (प्रतिनिधी) घरासमोर असलेल्या ट्रॅक्टरवर चढलेल्या पाच वर्षिय बालिकेचा लोंबकळलेल्या वीजतारांना स्पर्श होवून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी साडेअकरा वाजता निमखेडी शिवारात घडली. धनवी महेंद्र बाविस्कर (वय ५, रा. निमखेडी) असे मृत बालिकेचे नाव आहे. तर नंदुरबार शहरातील राणाप्रताप नगरात अॅल्युमिनियम विभागात काम करताना विजेचा धक्का लागल्याने मोनिस शेख शकील हलवाई (वय २०, रा. अलीसाब मोहल्ला) या तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली.
निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ राहणारे महेंद्र पाटील हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. धनवी ही त्यांची मोठी मुलगी धनवी. ती गल्लीतील ट्रॅक्टरवर खेळत असताना वादळामुळे लोंबकळलेल्या वीजवाहक तारेला तिचा स्पर्श झाला आणि विजेचा मोठा धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला. इतर मुला-मुलींनी घरांकडे धाव घेतली. तिच्या आईने ट्रॅक्टरजवळ धाव घेतल्यानंतर मुलीला मृतावस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी धनवी हिला जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. तर नंदुरबारमध्ये राणाप्रताप नगरात अॅल्युमिनियम विभागात काम करताना विजेचा धक्का लागल्याने मोनिस शेख याला सोबतच्या कामगारांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.