एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर कावड यात्रेसोबत आलेले एरंडोल शहरातील तिघं तरुण नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. तापी पात्रात बुडालेल्या तिघांचा शोध घेतला जात असून त्यातील दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले असून तिसर्या बेपत्ताचा तरुणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तिघंही तरुण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
एरंडोल शहरातील काही तरूण कावडयात्रा घेऊन दर्शनासाठी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा-तापी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर काही तरुण तापी पात्रात स्नानासाठी उतरल्यानंतर पियुष रवींद्र शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३) व अक्षय प्रवीण शिंपी (२२), हे तिघं चुलत भाऊ देखील पाण्यात उतरले. परंतू त्यांना पाण्याचा अंदाज न आणल्याने तिघे बुडाले. सोबतच्या तरुणांनी याप्रकाराची माहिती स्थानिकांना व प्रशासनाला दिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
तिघे तरुण तापी पात्रात बुडाल्याची माहिती कळताच पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पट्टीच्या पोहणार्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली तर तिसर्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परीरविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे एरंडोलसह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.















