येवला (वृत्तसंस्था) येवला- कोपरगाव मार्गावरील नांदेसर शिवारातील एका कंपनीतील दोन कामगारांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवीण नानासाहेब मोहन (३०, रा. नांदूर, ता. येवला) व आप्पासाहेब नामदेव गायकवाड (३४, रा. नाटेगाव शिवार, बदापूर, ता. येवला), अशी मयतांची नावं आहेत.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रवीण मोहन व आप्पासाहेब गायकवाड हे दोघे कंपनीत २० फुटांची मोठी शिडी घेऊन चालले असताना विजेच्या तारांना शिडीचा धक्का लागला. यावेळी शिडीत विजेचा प्रवाह उतरल्याने प्रवीण मोहन व आप्पासाहेब गायकवाड या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाइकांनी व नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, प्रवीण यांच्या पश्चात आई आणि लहान भाऊ असा परिवार असून परिवाराची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.