अमळनेर (प्रतिनिधी) मुलांच्या सुखासाठी आई-वडील सर्व गोष्टी करत असतात. पण काहींच्या नशीबात काही वेगळेच लिहिलेले असते. अशीच एक समाजमन सुन्न करणारी घटना अमळनेरात उघडकीस आलीय. कोरोनात नवरा गेल्यानंतर भीक मागूनही मुलांचे पोट भरता येत नाही म्हणून हतबल झालेल्या एका आईने सात बालकांपैकी एकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
लहान बाळाच्या विक्रीविषयी माहिती मिळताच अमळनेर पोलीसांनी संबंधित महिला व तिच्या सात बालकांना ताब्यात घेत. त्यांची जळगाव येथील महिला व बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. तत्पूर्वी या महिलेने पोलीस ठाण्यात पोलिसांना सांगितले की, कोरोना काळात माझा नवरा वारला. या मुलांचे यांचे पोट कसे भरू? म्हणून माझा नाईलाज आहे, ज्याला गरज आहे त्याला बाळ देऊन टाकेन…असे सांगितले. घटना ऐकल्यावर पोलिसांनाही गहिवरून आले. अधिक चौकशी केल्यावर या महिलेने अडीच वर्षाचे बाळ एकाला दिल्याचे समजले. त्यावेळी इतर मुले आपल्या आईला विनवणी करत होते की भाऊला देऊ नको….पोलिसांनी त्या महिलेने दिलेले बाळ परत मागवले. आणि जळगाव येथे महिला बाल कल्याण समितीचे प्रदीप पाटील व जोशी यांना बोलावून तिच्यासह ३ मुली आणि ४ मुलांना बाल कल्याण समितीकडे पाठवून दिले. दरम्यान, या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. अशी वेळ कोणत्याही मातेवर येऊ नये, अशीच भावना अनेकांनी बोलून दाखवली.