पाटोदा (प्रतिनिधी) तालुक्यातील नाळवंडी येथे शेतात तारेला चिकटून दोघ भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतात रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी विजेचा प्रवाह सोडलेला होता. याच तारेला हात लागून दोघ भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, हुसेन फकीरभाई शेख (वय ५८) व जाफर फकीरभाई शेख (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून बहुतांश शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जातात. हुसेन शेख हेदेखील आपल्या स्वतःच्या शेताच्या परिसरात असताना बाजूच्या रवींद्र ढोले यांच्या शेतात रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या तारेत विद्युत प्रवाह सोडलेला होता. अंधारात याच तारेला धक्का लागून हुसेन शेख हे चिकटले. त्याच वेळी त्यांना वाचवण्यासाठी भाऊ जाफर शेख हे त्या ठिकाणी गेले असता त्यांनाही विजेचा जोरदार झटका बसला व या घटनेत दोन्हीही भावांचा जागीच मृत्यू झाला.