मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाला काही प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा अनलॉक करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ही नवी नियमावली सोमवार ७ जूनपासून लागू होणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी अनलॉकबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर काल ४ जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.
पाच टप्पे नेमके कसे आहेत?
पहिला टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील तर
पाचवा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ
पहिला टप्प्यात सर्व सुरू असेल
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.