जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जामनेर आणि भुसावळ तालुक्यात गारपीट तर अमळनेर, रावेरसह काही ठिकाणी वादळी पावसाने बुधवारी झोडपून काढले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात अधूनमधून वादळी पाऊस, गारपिटीची मालिका सुरू आहे. बुधवारी देखील दुपारच्या वेळी अचानकपणे वादळी पावसाने हजेरी लावली. जामनेर तालुक्यात पहुर, वाकोद वाकडी, फतेपूर या परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस झाला. तर शेंदुर्णी परिसरात वादळामुळे केळीचे नुकसान झाले. भुसावळ शहर आणि उपनगरांमध्ये सायंकाळी गारपीट झाली. अमळनेर, चोपडा तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे,दीपनगर साकरी, येथे बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. याभागात अक्षरश: बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. त्यामुळे परिसरातील अनेक भागात गारांचा खच साचल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.