जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शिवाय नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (३१ जुलैपर्यंत) १० लाख ११ हजार ५०९ लसीचे डोस देण्यात आले आहे. यात ७ लाख ७३ हजार ९२ नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर २ लाख ३८ हजार ४१७ नागरीकांना दुसरा डोस दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले तर 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली. याकरिता जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालये आदि ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे आल्याने जिल्ह्यात कोरोना लसीकरणास वेग आला आहे.
नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच ४९ हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ७३ हजार ९२ नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर २ लाख ३८ हजार ४१७ नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ९७९ डोस हेल्थ केअर वर्कर्सला दिलेत. त्यात पहिला डोस ३० हजार ४६८ तर दुसरा डोस २० हजार ७०२ व्यक्तींनी घेतला आहे. तर ९० हजार २८ डोस फ्रंटलाईन वर्कर्सला दिलेत. त्यात पहिला डोस ६२ हजार ९७९ व्यक्तींनी, तर २७ हजार ४९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर ४५ वर्षावरील ७ लाख १६ हजार ७० नागरिकांना लसीचे डोस दिलेत. त्यात पहिला डोस ४ लाख ६३ हजार ८०४ व्यक्तींनी तर दूसरा डोस १ लाख ७२ हजार २६६ व्यक्तींनी घेतल्याची नोंद शासनाच्या कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन असून जिल्ह्याला प्राप्त होणा-या लसीनुसार नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून लसीकरण करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणास गर्दी करू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.