मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान सिंधुदुर्गात शिवसेना नेत्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय फिरवून दाखवावे असे म्हटले होते. नितेश राणे यांच्या आव्हानाला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कृतीतून उत्तर दिले आहे.
किरीट सोमय्या यांच्या कारवर मुंबईत हल्ला झाल्यानंतर पोलिसांना 24 तासासाठी रजेवर पाठवा मग बघा परिस्थिती कशी आटोक्यात आणतो असे आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले होते. त्यानंतर राणे यांनी सिंधुदुर्गातील शिवसेना नेत्यांना आव्हान दिले. शिवसेना आमदार वैभव नाईक यांना माहित आहे की मला राज्य सरकारकडून अधिकृत पोलीस संरक्षण देण्यात आले नाही आणि मला उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे संरक्षणही नकोय. मात्र, सिंधुदुर्गातील शिवसेना नेते पोलीस संरक्षणाशिवाय फिरू शकतील का, असा सवाल नितेश राणे यांनी केला होता.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या आव्हानानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक हे दररोज सकाळी कणकवली शहरात फेरफटका असतोच, नाष्टा करण्यासाठी असो वा सायकलिंग करण्यासाठी, अथवा व्यायामासाठी ते दररोज सकाळी पोलीस संरक्षणाशिवाय जातात असे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. मात्र, अमावस्या पौर्णिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या आमदार नितेश राणे यांना हे माहित नसल्याने आमदार वैभव नाईक यांनी कृतीतून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असल्याचे शिवसेनेने म्हटले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आमदार वैभव नाईक हे एकटेच असून त्यांच्यासोबत कोणतेही पोलीस संरक्षण दिसत नव्हते, असे व्हिडिओत दिसून आले आहे. आता पोलीस संरक्षणाच्या मुद्यावरून सिंधुदुर्गात आता नवीन राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत.