जळगाव (प्रतिनिधी) वैजनाथ ता. एरंडोल येथील वाळूगटाची तात्काळ इनकॅमेरा महसूल विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप करण्यात यावी, अशी मागणी अँड. विजय भास्करराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
अँड. विजय भास्करराव पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की, वैजनाथ ता. एरंडोल येथील वाळूगट १४२८ वास श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.तर्फे आदित्य श्रीराम खटोड (पत्ता, प्लॉट नं. १४०/२, ७७ जयनगर, महाबळ रोड, जळगाव, ता. जि. जळगाव) यांनी निविदा भरुन घेतलेला आहे. सदर निविदा धारकाने वाळूगटातील वाळू उपसा हा सुरु केलेला असून सदर वाळू उपसा हा पोकलॅण्ड लावून बेसुमार उपसा सुरु आहे. नदीपात्रात २० ते २५ फुटाचे मोठमोठे खड्डे याठिकाणी निर्माण झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्याने या खड्यात पाणी आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची ये-जा या परिसरात शेतीच्या कामानिमित्त सुरु असते. त्यामुळे या खड्यांमुळे जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. नियमबाह्य काम निविदाधारकाने केले असून भविष्यात अशी जिवीतहानी झाल्यास निवीदाधारक व प्रशासन जबाबदार राहील. तसेच या वाळूगटातून दररोज १०० ते १५० डंफरद्वारे नदीपात्रातून वाळू उचल केली जात आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडाला असून जवळपास १० ते १५ हजार ब्रास वाळू उपसा संबंधीत ठेकेदाराने केलेला आहे. मंजूर फक्त १४२८ ब्रास आहे. मग या वाळू ठेकेदारावर वरदहस्त कुणाचा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आव्हाणी व नारने, बांभोरी येथील निविदा धारकांचे सुमारे २५०० ते ३८०० ब्रास वाळू ठेक्याची उचल ही संपून देखील संबंधीत ठेके शासन जमा झाले. परंतू वैजनाथ येथील १४२८ ब्रास वाळूचा ठेका अजून देखील उचल होवून संपलेला दिसत नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे यात म्हंटले आहे.
शासनाची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी
त्वरीत अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांची सदर वैजनाथ वाळू ठेका मोजमाप प्रकरणी तात्काळ समिती नेमून इनकॅमेरा सदर वाळू ठेक्याचे मोजमाप करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन शासनाची कोट्यावधी रुपयांची केलेल्या महसुलाची दंडात्मक कारवाई आपल्या विभागाकडून करता येईल. व शासनाचे झालेले नुकसान व सदर ठेकेदाराने शासनाची केलेली दिशाभुल यासंबंधी संबंधीत ठेकेदारावर कठोर कारवाई करुन अतिरिक्त झालेल्या वाळू उपसाचा बोझा संबंधीत ठेकेदाराच्या नावावर लावण्यात यावा, अशी मागणी अँड. विजय भास्करराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.