धुळे (प्रतिनिधी) भारतरत्न, स्वरकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं नुकतंच दु:खद निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. या जगविख्यात गायिकेचं महाराष्ट्रासोबतचं नातं हे फार वेगळं होतं. लतादीदींचं आजोळ हे महाराष्ट्रातील खान्देश प्रांतातलं होतं. खान्देशातील धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात त्यांचं बालपण गेलं. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये त्याबाबतचा उल्लेख केलाय.
लहानपणी अनेकवर्ष थारनेरमध्ये वास्तव्य
त्यांच्या निधनानंतर माजी पर्यटन मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी लतादीदी यांचं खान्देशासोबत असलेलं नातं कसं होतं या विषयी माहिती दिली. “स्वरकोकीळा भारतरत्न लतादीदी आज आपल्यातून निघून गेल्या. खरंतर ही बातमी ऐकताच संबंध जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये शोककळा पसरली आहे. पण आमच्या खान्देशकरांसोबत लतादीदींचं एक वेगळं नातं होतं. म्हणून एक दु:खाचा डोंगर आमच्या खान्देशकरांवर कोसळला आहे. लतादीदींचं आजोळ हे धुळे जिल्ह्यातील थारनेर या गावी होतं. त्यांचं लहानपणी अनेकवर्ष थारनेरमध्ये वास्तव्य होतं. त्यांच्या बहिणी आणि साऱ्या परिवाराचं इथे वास्तव्य होतं. लहानपणी त्यांच्या आई आणि आजी त्यांना गाणी म्हणून दाखवायचे. त्यावेळी त्या आमच्या मायबोली अहिराणी भाषेतीलही बरेच गाणं ऐकायचे. लतादीदींच्या प्रत्येक स्वरात आमच्या अहिराणी भाषेचा एक गोडवा आहे, असं आम्हाला वाटायचं. म्हणून आमचं त्यांच्यासोबत एक वेगळं हृदयाचं नातं होतं. त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत ते आमच्या धुळे जिल्ह्यातील थाळनेरचा उल्लेख करायच्या”, असं जयकुमार रावल यांनी सांगितलं.
आमच्या अहिराणीचा आवाज हरपला
“थाळनेरचा किल्ला आहे. ऐतिहासिक स्थळ आहे. थाळनेरचे जमादार राजे हे आमच्या आत्याचे सासरे होते. त्यांच्यासोबत मंगेशकर कुटुंबाचे अत्यंत निकटचे संबंध होते. लतादीदींचं खान्देशासोबतचं एक वेगळं नातं होतं. आमच्या अहिराणीचा आवाज हरपला. मी तमाम खान्देशकरांच्यावतीने लतादीदींना आदरांजली वाहतो”, अशा शब्दांत रावल यांनी भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या सूरामध्ये अहिराणी
“आमच्या स्वरकोकीळा जगाला भावूक करणाऱ्या, त्यांचा आवाज प्रेरणा, ताकद होती. विश्वात त्यांचं नाव होतं. त्यांचं नाव आमच्या अहिराणीशी जोडलं गेलं होतं. त्यांच्या सूरामध्ये अहिराणी होती. याचा अभिमान प्रत्येक खान्देशीला होती. आज खूप दुखद घटना घडली. त्यांनी वयाची शंभरी पार करावी, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती”, असं जयकुमार रावल यावेळी म्हणाले.