अमरावती (वृत्तसंस्था) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आता याप्रकरणी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात धारणी न्यायालयात आणण्यात आले.
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वनविभागातच नव्हे तर, सोशल मीडियावरही ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ अशी मागणी बुलंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांच्या भूमिके विरोधातदेखील संताप व्यक्त होत आहे.
दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.