सावदा ( प्रतिनिधी ) – सावदा नगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकीत वानखेडे कुटुंबाने पुन्हा एकदा अभूतपूर्व कामगिरी करत शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. एकाच कुटुंबातील त्रिकूट निवडणुकीत विजयी झाल्याची नोंद दुसऱ्यांदा शहरात झाली असून, जनतेचा विश्वास आणि पाठिंबा वानखेडे कुटुंबाच्या बाजूने मजबुतीने उभा राहिल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. असा दुर्मिळ विक्रम सावदा शहरात आजपर्यंत इतिहासात अन्य कोणत्याही कुटुंबाला साध्य झालेला नाही.
माजी नगराध्यक्ष राजेश गजाननराव वानखेडे, त्यांच्या पत्नी सौ. रेखा राजेश वानखेडे आणि मुलगी सिमरन राजेश वानखेडे या तिघांनाही मतदारांनी विजयाचा कौल देत नगरपालिकेत विजयी केले आहे. सुवर्णकार समाजातील अल्पसंख्याक असलेल्या या कुटुंबाने आपली राजकीय परंपरा कायम राखत 1990 पासूनचा विजयाचा रथ अखंडितपणे पुढे नेला आहे.
1990 साली स्वर्गीय गजाननराव वानखेडे यांनी पहिली निवडणूक लढवून विजय मिळवत सावदा शहरातील राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर 2001 साली ताराबाई गजाननराव वानखेडे या लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या. पुढे 2011 मध्ये ताराबाई वानखेडे, राजेश वानखेडे आणि राजेश वानखेडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखा वानखेडे हे तिघेही निवडून आले होते. आज 2025 मध्ये पुन्हा हा इतिहास पुनरावृत्त होत या घराण्याची तिसरी पिढीही विजयी झाली आहे.
दरम्यान, शहरातील राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कामगिरीकडेही लक्ष वेधले जात आहे. निवडणुकीत सुरुवातीपासून दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त होत असतानाही पक्षाने लढवलेल्या 14 पैकी 7 जागांवर विजय मिळवत समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र प्रतिष्ठेच्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीत राष्ट्रवादीच्या सुभद्रा बडगे यांना केवळ 173 मतांच्या निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असून, भाजपाच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे.
सावदा शहरातील राजकीय प्रवास, सत्तांतरातील चढउतार आणि जनतेचा बदलता कल यामुळे आगामी काळात नगरपालिकेत रोचक घडामोडी पाहायला मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. शहरवासीयांनी दाखविलेल्या विश्वासामुळे वानखेडे कुटुंबाची नवी पिढीही विकासाच्या दिशेने कार्यरत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















