एरंडोल (प्रतिनिधी) अंजनी प्रकल्पात होणा-या जलसाठ्याचा लाभ शेतक-याना मिळत नाही, पाणी वाटप व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असून प्रकल्पातील जलसाठ्याचा लाभ शेतक-यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली. राज्य शासनाच्या अंदाज समितीच्या सदस्यांनी आज पद्मालय येथील अपूर्णावस्थेत असलेल्या साठवण बंधारा आणि अंजनी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी अंजनी प्रकल्पातील जलसाठ्याचा उपयोग केवळ पाणी वितरण व्यवस्था नसल्यामुळे शेतक-याना होत नसल्याचे सांगितले. तसेच प्रकल्पातील जलसाठा नदीच्या पात्रातून आणि बंधा-यातून केला जात असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे सांगितले. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे, कालव्यांचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र वितरण व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पातील जलसाठ्याचा उपयोग सिंचनासाठी झाल्यास शेतक-यांच्या जिवनात ख-या अर्थाने हरित क्रांती येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
पद्मालय येथील साठवण बंधा-याचे काम अनेक वर्षांपासून बंद असून बंधा-याच्या कामास गती मिळावी अशी मागणी केली. यावेळी अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे आणि सदस्यांनी संबंधित अधिका-यांकडून प्रकल्पाची माहिती आणि पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी आणि पदाधिका-यांनी अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणा-या गावांचे पुनर्वसन करून प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करावा अशी मागणी केली.
अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे, सदस्य आमदार संजय शिरसाठ, आमदार संजय गायकवाड, आमदार विनायक मेटे, आमदार चिमणराव पाटील, आमदार प्रकाश सोळंके, आमदार अमित झनक, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विलास पोतनीस, आमदार वजाहत मिर्झा, आमदार निलय नाईक, आमदार बळवंत वानखेडे, आमदार भरतशेठ गोगावले यांनी पद्मालय येथील साठवण बंधारा आणि अंजनी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. तसेच अधिका-यांकडून कामाची माहिती आणि अडचणींची माहिती जाणून घेतली. तसेच दोन्ही प्रकल्पांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. श्रीक्षेत्र पद्मालय येथे संस्थानचे उपाध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, विश्वस्त अमित पाटील आणि सदस्यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. कोरोनामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे समिती सदस्यांनी बाहेरूनच श्री गणेशाचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राउत, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, शहरप्रमुख अतुल महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी (भगत), दक्षता समितीचे सदस्य परेश बिर्ला, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, राजेंद्र ठाकूर, चिंतामण पाटील, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव यांचेसह विविध पक्षांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.