नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’वर निशाणा साधला आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर योग्य धोरण हवं. महिन्यातून एकदा होणाऱ्या ‘निरर्थक बात’ची गरज नाही, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे संकट ओढावले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच, लसीकरण मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी दररोज आढळून येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. तसेच, रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेस अनेक ठिकाणी स्थगिती द्यावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी ‘ मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. मात्र, तत्पूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर ‘मन की बात’ कार्यक्रमावरून ट्विट करत निशाणा साधला आहे. “कोरोनाशी लढण्यासाठी पाहिजे – योग्य हेतू, धोरण, निश्चय. महिन्यातून एकदा निरर्थक बोलणं नाही”, अशा शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान, कोरोना साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. लसीकरण मोहीम मोदी सरकारने योग्य पद्धतीने राबविली नाही तर कोरोना साथीच्या लाटांवर लाटा थडकत राहतील व त्या अधिक भयानक असतील असा इशारा राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला होता.
मोदींचा संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी भारतावर कोरोनाचे भयानक संकट आलेले असताना देशातील नागरिकांनी धैर्य दाखवले, गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात संपूर्ण देश पूर्ण ताकतीने लढतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या महामारीमुळे आलेल्या अनेक संकटांना देशाने यशस्वीपणे तोंड दिले आहे. या दरम्यान अम्फान, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते, यास वादळ तसेच अनेक ठिकाणी भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यांचाही देशाने चिकाटीने मुकाबला केला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.