मेष : व्यवसायात नवीन घडामोडींचा विचार करताना आपली आवक प्रथम लक्षात घ्या. त्यानंतरच नवीन घडामोडींचा विचार करा. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. २२, २३ तारखेला संपूर्ण दोन दिवस कोणाच्या आहारी न जाता सरळमार्गी वाटचाल ठेवा. या दोन दिवसांत आलेले प्रस्ताव स्वीकारू नका. उधार- उसनवारी करणे टाळा. व्यवहारात्मक गोष्टींनाच महत्त्व द्या. ज्या गोष्टींमध्ये आपला काहीही संबंध नाही अशा ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया देऊ नका. बाकी दिवस चांगले असतील.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा भरघोस उत्पन्न मिळेल. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज त्वरित फेडाल. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला असेल. बऱ्याच दिवसांतून मित्र-मैत्रिणींशी भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. दिनांक २४, २५ रोजी स्पष्ट बोलण्याची वेळ येणार आहे. त्या वेळी एक घाव दोन तुकडे करू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवून बोला. नाण्याला दोन बाजू असतात हे विसरू नका. दुसऱ्यांचा विचार करून स्वत:चा त्रास वाढवून घेऊ नका. आपले काम भले नि आपण भले हेच लक्षात ठेवा.
मिथुन : व्यावसायिकदृष्टय़ा भरभराटीचे दिवस असतील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. दिनांक १९ रोजीचा एकच दिवस सोडला तर चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. सप्ताहातील काही दिवस चढउताराचे असतात, याचा अनुभव जरी असला तरी सध्या सप्ताहात शुभ पडघम वाजेल हेही तितकेच सत्य आहे. कुठेही पुढे पुढे करण्याची गरज भासणार नाही.
कर्क : व्यवसायात उधारीचे व्यवहार जपून करा. कोणतेही निर्णय घेताना भावनिक विचार टाळा. नोकरदार वर्गाला मागील कामाचा अनुभव विसरून चालणार नाही. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. २०, २१ तारखेला संपूर्ण दोन दिवस घालमेल वाढवणारे आहेत. महत्त्वाच्या गोष्टी या दिवसांत करू नका. या दोन दिवसांमध्ये आलेला प्रस्ताव स्वीकारू नका. त्यामुळे आगामी काळाचे नुकसान होऊ शकते. इतरांना सल्ला देणे टाळा.
सिंह : व्यवसायात नवीन काही करणे नुकसानीचे होऊ शकते. सध्या जशी परिस्थिती आहे तशीच स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाने कामात गुंतून राहिलेले चांगले. आर्थिकदृष्टय़ा उधारीचे व्यवहार टाळा. तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाला सांगत बसाल तर स्वत:चेच हसे करून घ्याल. सध्याची वेळ आपली नसल्यामुळे समोरच्याला आपल्यामधील प्रामाणिकपणाचे तत्त्व दिसणार नाही. त्यामुळे निराशा होऊ शकते. त्यापेक्षा स्वत:च्या कामात गुंतून राहा. कोणाचा विचार करणे टाळा.
कन्या : व्यवसायातील बारीकसारीक गोष्टींचा विचार करा. तोटा होणार नाही याकडे लक्ष द्या. नोकरदार वर्गाने काम करताना आपली मानसिकता नीट ठेवा. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग टाळा. घरातील सदस्यांवर आपले मत लादण्याचा प्रयत्न करू नका. सध्या शुभ ग्रहांची स्थिती दमट वातावरणासारखी असेल. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागतो की काय असेच वाटेल. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात हे विसरू नका. आपले मत जिथे व्यक्त करणे गरजेचे आहे अशाच ठिकाणी व्यक्त करा. नको त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करू नका.
तूळ : व्यावसायिकदृष्टय़ा आलेले प्रस्ताव फायद्याचे ठरतील. मात्र ते चांगल्या दिवसांमध्ये स्वीकारा. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. अनावश्यक खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात मतभेद वाढू देऊ नका. दिनांक २२, २३ रोजीचे दोन दिवस कोणाच्या भानगडीत पडू नका. कोर्ट-कचेरी या गोष्टींपासून लांब राहा. कोणालाही जामीन राहण्यापूर्वी ती व्यक्ती त्या योग्यतेची आहे का हे नीट तपासून पाहा, अन्यथा स्वत:हून स्वत:ची अडचण वाढवून घेऊ नका. हे दोन दिवस शांत राहून सुवर्णमध्य साधा.
वृश्चिक : व्यवसायात अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा एकाच ठिकाणी गुंतवणूक केलेली चांगली. स्वत:च्या जबाबदारीवर कामाचे नियोजन करा. नोकरदार वर्गाने पर्यायी मार्ग स्वीकारा. आर्थिक बाबतीत देवाण-घेवाण जपून करा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. दिनांक २४, २५ रोजी कोणाला वचनबद्ध राहू नका. जबाबदारीने प्रत्येक गोष्ट करावी लागेल. कोणाच्या सांगण्या- बोलण्यावर विश्वास ठेवू नका. त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. जोपर्यंत प्रत्यक्षात स्थिती पाहत नाही, तोपर्यंत त्यावर काही बोलू नका.
धनू : व्यावसायिकदृष्टय़ा पारडे जड होईल. मागणी तसा पुरवठा करणे शक्य होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत होणारा संघर्ष कमी होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात कार्यरत राहाल. व्यसनी व धूर्त मित्रांपासून लांब राहा. सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत. अमावास्या कालावधीत शेजाऱ्यांशी वादविवाद टाळा. विनाकारण कोणतीही जबाबदारी स्वत:हून ओढवून घेऊ नका. त्यामुळे गुंतून राहावे लागेल. सध्या स्वत:ला मनमोकळेपणाने कसे जगता येईल हेच बघा. दुसऱ्याचा विचार करून स्वत:चे चांगले दिवस व्यर्थ घालवू नका.
मकर : व्यावसायिकदृष्टय़ा नवीन प्रयोग यशस्वी होतील. जुन्या व्यवहारातून उधारी वसूल होईल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत फारशी कसरत करावी लागणार नाही. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. प्रत्येक दिवस सारखा नसतो याचा अनुभव तर आहेच. मात्र हा सप्ताह अनुकूलता वाढवणार आहे. द्विधा अवस्था कमी होईल. संवादातून लाभ होईल. प्रत्येक गोष्टीचे समीकरण जुळून येईल. पत्रव्यवहारातून शुभेच्छा मिळतील.
कुंभ : प्रत्येक गोष्टीत आघाडी मिळवता येईल. सहजमार्गी कामे होतील. इतरांची मदत मिळेल. व्यवसायात ओळखीच्या माध्यमातून फायदा होईल. त्यामुळे प्रभावक्षेत्र वाढेल. व्यवहारात बाजी माराल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्टय़ा ऊर्जितावस्था येईल. भावंडांशी वाद टाळा. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मानसिक ताणतणाव कमी होईल. १९ तारखेला कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. हा दिवस सोडून बाकी दिवस उत्तम राहतील. ज्या कामाचा श्रीगणेशा होत नव्हता तो आता होणार आहे. तेव्हा वेळापत्रक करायला विसरू नका.
मीन : वनस्पतीजन्य मालाची साठवणूक मोठय़ा प्रमाणात करू नका. दलाली व्यवसाय करताना भान ठेवा. नोकरदार वर्गाला जास्तीच्या कामाचा व्याप कमी होईल. खर्च कमी करा. दिनांक २०, २१ रोजी दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे या दोन दिवसांत कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. चिडचिड न करता निर्णय घ्यायला शिका. काही गोष्टी अपवादात्मक समोर येतात. त्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका. तो विचार सोडून द्या. इतरांवर अवलंबून राहू नका.