मेष : या सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मनासारख्या होतील. इतरांच्या सल्ल्याने पुढे जाण्याची गरज भासणार नाही. स्वत: स्वत:च्या कामाचा सुरु केल्याने अडथळा येणार नाही. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असते हे अनुभवातून शिकावयास मिळाले. त्यामुळे पुढील वाटचाल यशस्वी राहील. व्यवसायात चाललेल्या घडामोडींत अचानक बदल होतील. हे बदल फायद्याचे असतील. नोकरदार वर्गाला जे कामांमध्ये तासन् तास गुंतून राहावे लागत होते ते आता कमी होईल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा दमदार पावले पडतील. व्यवहार मनासारखे होतील. नोकरदार वर्गाला काम करताना वरिष्ठांचा मुद्दा डावलून चालणार नाही. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. राजकीय क्षेत्रातील परिश्रम वाढतील. प्रत्येक आठवडय़ामध्ये एक तरी दिवस काळजी घ्या. असे करू नका, तसे करू नका असे ग्रहमान असायचे.सध्या मात्र सरळ मार्ग दिसणार आहे. म्हणजेच सर्व दिवस चांगले असल्यामुळे काम करताना वेळ मिळणार नाही अशीच परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे वाईट काय, चांगले काय, हा विचारसुद्धा मनात येणार नाही.
मिथुन : व्यवसायात नफा वाढला की गुंतवणूक वाढेल. हे मात्र तुमच्या बाबतीत निश्चित ठरणार आहे. व्यावसायिकदृष्टय़ा उत्तुंग भरारी माराल. नोकरदार वर्गाच्या कामात इतरांनी केलेली ढवळाढवळ त्रासाची राहत होती. सध्या ही ढवळाढवळ बंद होणार आहे. आर्थिकदृष्टय़ा समाधानकारक परिस्थिती असेल. चांगले होण्यासाठी चांगल्या वेळेची वाट बघावी लागते, असेच म्हणावे लागेल. म्हणजे सध्याचा कालावधी आघाडी मिळवून देणारा आहे. आतापर्यंत एका कामासाठी दहा हेलपाटे घालावे लागत होते. सध्या मात्र एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे.
कर्क : व्यवसायात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाने विरोधी भूमिका घेणे टाळा. खर्च बेताने करा. राजकीय क्षेत्रात जिथे आपला काही संबंध नाही अशा ठिकाणी हस्तक्षेप करू नका. दिनांक १८, १९, २० हे संपूर्ण दिवस कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. कारण हे तीन दिवस गैरसमजाचेच आहेत. एखाद्या व्यक्तीने मदत केली नाही म्हणून त्याचा राग मनात धरू नका, कारण सध्याची वेळ तुमची चांगली नाही हे विसरू नका. प्रत्येक वेळी गोष्टी जमेच्या ठरतील असे नाही. त्यात चढ-उतार राहणारच आहे. इतरांच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेऊ नका. हे तीन दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.
सिंह : व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाने कामात गुंतून राहिलेले चांगले. खर्च मर्यादित करा. मित्रमैत्रिणींच्या बाबतीत आशावादी दृष्टिकोन राहील.जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. २० तारखेला दुपारी ४ नंतर व दिनांक २१, २२ ला संपूर्ण दिवस म्हणजेच हाच अडीच दिवसांचा कालावधी ‘हत्ती गेला नि शेपूट राहिले’ असेच वाटेल. इतके दिवस तोंडावर ताबा ठेवला होता त्याचा तोल जाणार आहे. म्हणजेच शांततेने जी गोष्ट ठरवलेली होती ती या दिवसांत शांतता भंग करणारी आहे. हे दिवस फारसे अनुकूल नाहीत.
कन्या : व्यावसायिकदृष्टय़ा ग्राहकांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न करा.नोकरदार वर्गाने काम करत असताना चर्चासत्रात अडकू नका. वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढेल. दिनांक २३, २४ रोजीचे दोन दिवस लक्षात ठेवूनच राहावे लागेल. म्हणजेच एखाद्याची चेष्टा करायला गेलात तर ती अंगलट येऊ शकते. कोणाच्या सांगण्यावरून एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. कारण नसताना त्रास ओढून घेतल्यासारखे असेल. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका.
तूळ : व्यावसायिकदृष्टय़ा आघाडी मिळवाल. कमी श्रमात जास्त फायदा मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागणार नाही. आर्थिकदृष्टय़ा चिंता मिटेल. वारंवार प्रयत्न करूनही एखाद्या गोष्टीला यश न येणे म्हणजे हरून गेल्यासारखे वाटत होते. सध्या ही भीती मनातून काढून टाका, कारण सध्याची वेळ-काळ आपल्याला साथ देणारी आहे. आता वारंवार प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. ज्या अपेक्षेने कामाची सुरुवात करता ती अपेक्षा आता पूर्ण होणारी आहे.
वृश्चिक : व्यावसायिकदृष्टय़ा स्पर्धा करण्यापेक्षा फायदा कसा मिळवता येईल ते पाहा. नोकरदार वर्गाला संयम ठेवून वागावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. दिनांक १८, १९, २० हे संपूर्ण तीन दिवस सहज वारी घेऊन चालणार नाही. जुन्या गोष्टी काढून वाद करत बसू नका. इतरांचे मत ऐकून घेण्याची क्षमता वाढवा. त्यावर प्रतिक्रिया देत बसू नका. हो म्हणा आणि पुढे चला, त्यामुळे त्रास होणार नाही. एखाद्या गोष्टीत माघार घेतलेली चांगली असते ही वेळ गेल्यानंतर कळते. सध्या हे तीन दिवस माघार घेण्याचे आहेत हेही विसरू नका.
धनू : व्यावसायिकदृष्टय़ा चढउतार राहील. नोकरदार वर्गाने काम करताना मागील अनुभव विसरून चालणार नाही. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. दिनांक २० ला दुपारी ४ नंतर व दिनांक २१, २२ रोजी संपूर्ण दिवस असा हा कालावधी फार चांगला आहे असे म्हणता येणार नाही. बसल्या- बसल्या वादाला उकळी फुटेल आणि या उकळीची सुरुवात तुमच्याकडून होणार आहे. मागचापुढचा विचार न करता बोलायला जाऊ नका. हे त्रासाचे ठरू शकते. नंतर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा सध्या शांत राहा.
मकर : या सप्ताहात सर्वच दिवस जपून पाऊल टाकावे लागेल. शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोप- प्रत्यारोप करण्यापेक्षा स्वत:त बदल करा, त्यामुळे त्रास वाढणार नाही. तुमचे मत इतरांसमोर व्यक्त करताना भडक प्रतिक्रिया टाळा. व्यवसायात मोठय़ा उलाढाली सध्या करू नका. नोकरदार वर्गाने कामाचे नियोजन करावे. आर्थिक बाबतीत उधारीचे व्यवहार टाळा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या भावनांचा आदर करा. जोडीदाराची साथ मिळेल.मानसिक द्विधावस्था राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ असेल. ही पळापळ कमी करायची असेल तर त्यासाठी कामाचा आराखडा तयार करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची नियमावली पाहूनच काम करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा रोखीचे व्यवहार करा. दिनांक २१, २२ रोजी कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे या दोन दिवसांत महत्त्वाचे काम टाळा. जी गोष्ट आपण प्रत्यक्षात पाहिलेली नाही अशा गोष्टींविषयी वाच्यता करू नका. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करत बसू नका. स्पष्ट बोलून वाईटपणा घेण्यापेक्षा शांत राहून काम करा. त्यामुळे गैरसमज होणार नाहीत.
मीन : व्यवसायात अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त उत्पन्न मिळेल. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज वेळेत फेडण्याचे नियोजन होईल. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांचा पाठिंबा राहील. अनावश्यक गोष्टींचा खर्च टाळा. दिनांक २३, २४ रोजी सर्व काही चांगले असताना अस्वस्थता जाणवू लागेल. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी मनमोकळेपणाने संवाद साधा. त्यामुळे मनामध्ये कोणतीही खंत राहणार नाही. चांगल्या गोष्टींचा शुभारंभ करायचा असेल तर तो या दोन दिवसांत मात्र करू नका. झालेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका.