मेष : एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे, म्हणजेच कमी वेळेत कामकाजाला गती येईल. ज्या गोष्टींची इच्छा मनापासून होती ती पूर्ण होत नव्हती असे मनसुबे आता पूर्ण होतील. व्यवसायातील आवकजावक वाढेल. व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी होणारे नुकसान टाळता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे सकारात्मक बदल झालेले जाणवतील. जी गोष्ट होत नाही म्हणून तुम्हाला काळजी वाटत होती ती आता मिटणार आहे.
वृषभ : व्यवसायात चाललेल्या घडामोडीत अचानक बदल होतील. हे बदल आगामी काळासाठी चांगले असतील. मेहनतीचे फळ मिळेल.नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिक भरभराट होईल. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. भावंडांची भेट होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती ठणठणीत राहील. २७ एप्रिल तुमच्या सोन्या-नाण्यात वाढ करणारा आहे. या आठवडय़ात सर्वच दिवस चांगले जातील. त्यामुळे काय करायचे आहे याचे नियोजन करून घ्या. कुठेही कमी पडू नका. संधी आपल्या हातात आहे हे विसरू नका.
मिथुन : दिनांक २३ हा संपूर्ण दिवस २४ तारखेला दुपापर्यंत असा हा दीड दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. एखादी गोष्ट निराशाजनक वाटू शकते, पण असे वाटले तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, परिणामी त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात कोणतेही काम इतरांच्या भरवशावर करू नका. नवीन काही व्याप वाढवण्यापेक्षा आहे त्यातच लक्ष घाला. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होतील. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष केंद्रित करा.
कर्क : संवाद जपून करा. दुसऱ्यांसाठी स्वत:ला त्रास करून घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. खर्च कमी करा. संततीसौख्य लाभेल. २७ एप्रिल रोजी आगामी काळासाठी काही नियोजन करत असाल तर ते यशस्वी होईल. दिनांक २४ तारखेला दुपारनंतर २५, २६ हे संपूर्ण दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी कितीही प्रयत्न करून चांगले वागायचे ठरवले तरीसुद्धा आडवळणी मार्गाने जावेच लागेल.
सिंह : दिनांक २७, २८ हे संपूर्ण दिवस व २९ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत सहनशीलता ठेवा. हे दिवस असे असताना कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका. स्वत:च्या कामात गुंतून राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. फायद्याचे प्रमाणही चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून प्रेरणा मिळेल. खर्च आटोक्यात ठेवले तर बचतीत वाढ होईल.
कन्या : हा सप्ताह तसा इतर दिवसांपेक्षा वेगळा असणार आहे. मनासारख्या गोष्टी घडणार आहेत. तेव्हा जे काही करायचे आहे ते आत्ताच करायचे आहे हे ठरवून तयारीला लागा. आता कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही. कामे अगदी सहज गतीने होणार आहेत. व्यावसायिक स्तरावर निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होतील. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेता येईल.मनासारखी कामे होतील. नोकरदार वर्गाला ओळखीचा फायदा होईल. आर्थिक सफलता मिळेल.
तूळ : या आठवड्यात गोड बातमी कळेल. स्वत:च्या कर्तृत्वाने प्रसिद्धी मिळणार आहे.खूप संघर्ष करूनही काही गोष्टी साध्य होत नव्हत्या. सध्या त्या संघर्ष न करता मिळणार आहेत. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती उत्तम राहील. त्यामुळे गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात केली तरी चालेल. नोकरदार वर्गाचे कामकाज चांगले राहील. आर्थिक विवंचना दूर होईल. राजकीय क्षेत्रात घेतलेले निर्णय योग्य असतील. मैत्रीच्या नात्यात दुरावा येणार नाही याची दक्षता घ्या.
वृश्चिक : दिनांक २४ तारखेला दुपारनंतर २५, २६ संपूर्ण दिवस अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत आळस करून चालणार नाही. एखाद्या गोष्टीविषयी आवड नसली तरी ती आवड निर्माण करावी लागेल. माझेच खरे करत बसण्यापेक्षा त्यावर पर्याय शोधा. वादविवादापासून लांब राहा. हे दिवस आनंदात कसे घालवता येतील ते पाहा. व्यवसायात ओढूनताणून कोणतीही गोष्ट करण्यात अर्थ राहणार नाही. जी गोष्ट जमणार नाही त्या गोष्टीसाठी प्रयत्न वाढवू नका. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा.
धनू : सर्वच दिवसांकडे लक्ष देऊन दिवस ढकलले गेले पाहिजेत. ज्या वेळेस असे भ्रमण असते त्या वेळी प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता वाटत असते. या कालावधीत चिडचिड होणार. वादविवाद या गोष्टीला आपण स्वत:हून जवळ करणार. तेव्हा क्रोधावर नियंत्रण ठेवा. प्रत्येक गोष्ट ही धीराने घ्या. व्यवसायात खरेदीविक्रीचे व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. आर्थिकदृष्टय़ा नियोजन करा. मानसिक समतोल राखा. आध्यात्मिक गोष्टींत गुंतून राहा. प्रकृतीची काळजी घ्या.
मकर : या आठवड्यात प्रत्येक दिवस हा नवीन काही तरी घेऊन येणार आहे. ते तुमच्यासाठी अनपेक्षित असेल तेव्हा अशा या कालावधीत संयम ठेवून कोणतीही गोष्ट केल्यास त्रास वाटणार नाही. एखादी गोष्ट नाही पटली तर सोडून द्या. स्पष्टवक्तेपणा टाळा. त्याच्या तळाशी जात बसू नका. हे दिवस कायमस्वरूपीचे नाहीत. ऊनसावलीच्या खेळाप्रमाणे असलेला हा कालावधी चढउतारांचा आहे हे लक्षात ठेवा. व्यवसायात इतरांवर अवलंबून राहू नका.
कुंभ : दिनांक २७, २८ हे संपूर्ण दिवस व २९ तारखेला दुपापर्यंत या कालावधीत विचार करून कृती करायला हवी. फार घाईगडबड केल्यास नुकसान होऊ शकते. कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेऊ नका. दुसऱ्यांचे ऐकून घ्या. त्यावर स्वत:चे मत तयार करा. प्रत्येक गोष्टीत नियोजनाला महत्त्व द्या. बाकी दिवस चांगले राहतील. व्यवसायात यशस्वी वाटचालीसाठी व्यवहार रोखीचे केल्यास फायद्याचे ठरतील. आर्थिक बचत करा. सार्वजनिक ठिकाणी मदतीचा हात पुढे कराल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण कराल.
मीन : दिनांक २९ रोजीचा दुपारनंतरचा कालावधी सोडला तर सप्ताहातील सर्वच दिवस चांगले आहेत. मग आता चांगल्या कामासाठी उशीर कशाला? ज्या कामांचा श्रीगणेशा होत नव्हता तो आता होणार आहे. प्रलंबित कामांना गती येईल. त्यामुळे कामातील उत्साहही वाढेल. व्यवसायासाठी केलेल्या कर्जाची परतफेड होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कामाच्या बाबतीत जादा कामाचे नियोजन करून घेतले जाईल. आर्थिक प्रश्न सुटेल. राजकीय क्षेत्रात कामातील बदल स्वीकारावे लागतील.