मेष : कारण नसताना एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते. तेव्हा अशावेळी संयम ठेवा. लक्ष्मी, कुबेरपूजन हा दिवस मात्र उत्तम जाईल.अमावास्या प्रहर शांततेत पार पाडा. दिनांक २५ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण तुमच्या राशीस मिश्र फलदायी असेल. व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टींच्या नादी लागू नका. जे आहे त्यातच समाधान माना. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च आटोक्यात ठेवा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक वाद टाळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
वृषभ : आठवडय़ातील सर्वच दिवस चढउतारांचे राहतील. अशा वेळी कोणत्याच गोष्टीवर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्ट समय सूचकतेने करावी लागेल. त्यासाठी राग राग करून चालणार नाही. सर्व दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल हेच लक्षात ठेवा. लक्ष्मीपूजन दिवशी कोणतीही घाई न करता शांतपणे लक्ष्मीपूजन करा. व्यावसायिकदृष्टय़ा धावपळ होईल. कष्टाच्या मानाने फायद्याचे प्रमाण कमी राहील. नोकरदार वर्गाला कामाची जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे कल राहू द्या. मुलांची हौसमौज पूर्ण कराल.
मिथुन : दिनांक २७, २८ रोजी बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. विचाराने पाऊल उचला. गडबडीने घेतलेला निर्णय त्रासाचा ठरू शकतो. कायद्याच्या बाबतीत नियमांचे पालन करा. बाकी दिवस चांगले असतील. दिनांक २५ तारखेला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण हे मिश्र फल देणारे ठरेल. व्यवसायात आवक-जावक उत्तम राहील. मात्र व्यवसाय वाढीसाठी मोठय़ा प्रमाणात कर्ज घेऊ नका. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होतील. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा.
कर्क : आठवडय़ातील सर्वच दिवस चांगले असतील. सणावाराची गडबड चालू राहील. सणासुदीच्या हौसेला मोल राहणार नाही. लक्ष्मीपूजनाचा दिवस कुटुंबासोबत उत्साहाने साजरा कराल. अमावास्या कालावधी चांगला जाईल. नवीन काही करण्याचा आग्रह धरू नका. व्यापारी वर्गाला खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता जाणवू लागेल. व्यावसायिक प्रगती होईल. फायद्याचे प्रमाण उत्तम राहील. नोकरदार वर्गाने कामकाजाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहू नका. धनदायक गोष्टीत वाढ होईल. समाजसेवा करताना इतरांकडून अपेक्षा ठेवू नका.
सिंह : प्रत्येक आठवडय़ामध्ये एक ना एक दिवस तरी खराब जात असतो. पण या आठवडय़ात सर्व दिवसांचा कालावधी चांगला जाईल. सणासुदीचे दिवस आहेत. सध्या मात्र ताणतणावाचे वातावरणच निर्माण होणार नाही असे ग्रहमान आहे. मग आता तयारीला लागा. ज्या कामाचा श्रीगणेशा होत नव्हता त्याला सुरुवात होईल. व्यवसायात नवनवीन योजना राबवून फायद्याचे प्रमाण कसे वाढेल याकडे लक्ष केंद्रित कराल. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक सफलता मिळेल.
कन्या : सप्ताहाच्या सुरुवातीस तुमच्याच राशीतून होणारे चंद्र ग्रहाचे भ्रमण शुभ फलदायी ठरेल. मनामध्ये ज्या गोष्टींविषयी खंत वाटत होती, त्या गोष्टींचा अंत होईल. त्यामुळे धाडसी निर्णय घ्याल. व्यावसायिकदृष्टय़ा केलेली जाहिरात ग्राहकांचा प्रतिसाद मिळवून देणारी असेल. नोकरदार वर्गाच्या मागण्या पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. मुलांची हौस पूर्ण कराल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : दिनांक २३, २४ रोजी एखाद्या गोष्टीचा मोह किती करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवा. कारण सध्याचे हे दोन दिवस कितीही प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. तेव्हा हे दोन दिवस तरी घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. यानंतरचे दिवस चांगले असतील. लक्ष्मी-कुबेरपूजन तुमच्या राशीतूनच होत आहे. त्यामुळे मनाला एक आनंद देणारे वातावरण निर्माण होईल. व्यवसायात दुसऱ्यांवर अवलंबून राहणे टाळा. काय करायचं असेल ते स्वत:च करा. नोकरदार वर्गाची काम करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. भावंडांशी वाद टाळा. घरगुती वातावरण ठीक राहील.
वृश्चिक : दिनांक २४, २५ व २६ असे हे तीन दिवस कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत ढवळाढवळ करू नका. तुमचा प्रयत्न कितीही चांगला असला तरी तो इतरांना चांगला वाटणार नाही. त्यासाठी ‘आपण भले व आपले काम भले’ हेच सूत्र योग्य राहील. लक्ष्मी-कुबेरपूजनाचा दिवस लाभाचा राहील. व्यवसायातून फार मोठय़ा फायद्याची अपेक्षा ठेवू नका. जे मिळणार आहे त्यात समाधान माना.नोकरदार वर्गाची अस्वस्थता कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा खर्चावर नियंत्रण ठेवा. समाजसेवेत मन गुंतणार नाही. मैत्रीच्या नात्यातील संवाद मनाला सुखद आनंद देणारा असेल.
धनू : दिनांक २७, २८ असे हे दोन दिवस धावपळ होईल; पण धावपळ करतानासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. मागे केलेल्या चुका पुन:पुन्हा करू नका. नको त्या कारणासाठी केलेली धावपळ त्रासाची ठरू शकते. तेव्हा कोणतेही काम करताना डोके शांत ठेवून करा. बाकी दिवस चांगले असतील. लक्ष्मीपूजनाचा दिवस आनंदाचा जाईल. नवीन मालाचे उत्पादन व्यवसायात भरघोस यश मिळवून देईल. नोकरदार वर्गाचा कामातील तांत्रिक अडथळा कमी होईल. आर्थिक परिस्थितीत बदल झाला तरी खर्चावर नियंत्रण ठेवावेच लागेल.
मकर : दिनांक २९ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वत:हूनच प्रयत्न वाढवा. या प्रयत्नांना यश मिळेल. सध्याचे दिवस हे लाभाचे आहेत हे विसरू नका. लक्ष्मी-कुबेर पूजन सर्वासोबत आनंदाने साजरे कराल. व्यवसायातील उत्पन्नात वाढ होईल. नोकरदार वर्गाला मनासारखा बोनस मिळेल. आर्थिक भरभराट होईल. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ मिळेल. जिवलग मित्रांसोबत महत्त्वाचे करार होतील. कौटुंबिकदृष्टय़ा ठरवलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मनोरंजन होईल.
कुंभ : दिनांक २३, २४ या दोन दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नसला तरी कामात वेळ जाईल. हे काम करताना मात्र सतर्कता बाळगा. कोणतेही काम लक्ष केंद्रित करून नाही केल्यास त्याचा व्याप वाढू शकतो. हे दोन दिवस सोडल्यानंतरचे दिवस चंद्र ग्रहाचे भ्रमण हे भाग्यस्थानातून होत आहे. याच कालावधीत गोड बातमी मिळेल. लक्ष्मीपूजन उत्साहाने साजरे कराल. नोकरदार वर्गाचे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. घरगुती वातावरण आनंदी राहील.
मीन : दिनांक २५, २६ या दोन दिवशी महत्त्वाचे काम करू नका. यापूर्वी कोणत्या व्यवहाराची बोलणी झाली असतील तर ती मात्र या दोन दिवसांत पूर्ण करू नका. या दोन दिवसांनंतरचा कालावधी हा चांगला असेल. लक्ष्मीपूजनदिवशी धावपळ जरी झाली तरी वेळेत सगळय़ा गोष्टी होतील. अमावास्या कालावधीत वाद होणार नाही याची काळजी घ्या. सध्या नफ्याचे प्रमाण वाढलेले असेल. नोकरदार वर्गाला कामकाजातून वेळ मिळणार नाही. आर्थिक लाभ होतील. राजकीय क्षेत्रात कोणत्याही कामाचा पुढाकार घेताना उत्साह वाटेल.