मेष : या सप्ताहात सर्वच दिवस जपून पाऊल टाकावे लागेल. चांगल्या उद्देशाने कोणतेही काम करायला गेले तरी ते उलट होत असते. या सप्ताहात एकाच गोष्टीवर अडून राहू नका. ज्या गोष्टी जमणार नाहीत किंवा होत नाहीत, अशा गोष्टींचा नाद सोडून द्या. बोलताना सडेतोड भूमिका टाळा, त्यामुळे बरेच काही बिघडू शकते हे लक्षात ठेवा. राग राग करून कोणतीही गोष्ट सिद्धीस जाणार नाही. संयम ठेवा. सध्या शांत राहून काम करावे लागेल. व्यवसायातील जी स्थिती आहे त्यातच समाधान माना. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यावे. खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा धावपळ झाली तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. अनावश्यक खर्च टाळा. २५ तारखेला दुपारनंतर २६ व २७ तारखेचे संपूर्ण दिवस सतर्कता बाळगावी लागेल. एखाद्या गोष्टीचा पटकन राग आला तर तो व्यक्त करू नका, कारण त्यामुळे वाद वाढू शकतात. हा वाद वाढू नये असे वाटत असेल तर आपल्या प्रतिक्रिया न देता शांतच राहा. खरे काय खोटे काय याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. कोर्टकचेरी या गोष्टींपासून लांब राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
मिथुन : व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आताच घाई करू नका. थोडा वेळ द्या. नोकरदार वर्गाला कामातील त्रास कमी होईल. खर्च आटोक्यात ठेवा. दिनांक २८, २९ या दोन दिवसांत आळस राहील, त्यामुळे कोणतेच काम पुढे सरकणार नाही. तेव्हा हा आळस करून चालणार नाही. कामाचे नियोजन करून काम केल्यास वेळेआधी काम पूर्ण होईल. या दिवसांत इतरांच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षाभंग होऊ शकतो. कोणाशीही संवाद करताना तो जपूनच करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
कर्क : व्यवसायात कर्ज स्वरूपात घेतलेली देणी होती ती चुकती कराल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात वाढ होईल. राजकीय क्षेत्रात सध्या उत्साह वाटणार नाही. घरामध्ये महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा चालू असताना मागील जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. या आठवडय़ात सर्वच दिवस चांगले असतील. प्रत्येक काम अगदी मनासारखे होऊ लागेल. आपले काम करता करता इतरांनाही मदत कराल. त्यामुळे इतरांना मिळालेला आनंद तुमच्यासाठी लाखमोलाचा असेल. ज्या ज्या वेळी असेच ग्रहमान असते त्या त्या वेळी आपले काम होणार आहे हे गृहीत धरा.
सिंह : सध्याचे वातावरण चांगले असल्यामुळे थांबलेल्या कामांना गती मिळेल. कोणाच्या मागे लागून कोणतीही गोष्ट करण्याची गरज भासणार नाही. सध्या कोणी सल्ला दिला तर तो तुम्ही ऐकून घ्याल, पण तुम्हाला जे करायचं आहे तेच कराल आणि त्यातच यश मिळेल. सर्व दिवस चांगले जातील. व्यवसायात आलेले प्रस्ताव स्वीकारण्यास हरकत नाही. उत्पादनवाढीचा वेग गतिशील असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी संधी प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांना नाराज करू नका. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा.
कन्या : व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतील. त्यामुळे आगामी काळासाठी गुंतवणूक करणे सहज शक्य होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात झालेले बदल नवीन असतील. आर्थिक प्रश्न मिटेल. घरगुती वातावरण ठीक राहील. या आठवडय़ातील वातावरण अनुकूल असेल. प्रत्येक दिवस कसा जाईल याची चिंता जाणवत राहते. सध्या चिंता जाणवणार नाही. अपेक्षित काम झाल्यामुळे एक प्रकारचा आनंदच असेल. यापूर्वी जो प्रतिसाद मिळत नव्हता तो मिळेल, त्यामुळे कोणत्याच कामात अडथळा राहणार नाही.
तूळ : कायदा क्षेत्रातील नियमांचे पालन करा. इतरांच्यात हस्तक्षेप करणे टाळा. गैरसमज या गोष्टींपासून दूर राहा. सकारात्मक विचार करा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायात पर्यायी मार्गाचा अवलंब करा. उधारीचे व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या वेळेत पूर्ण कराव्या लागतील. दिनांक २३, २४ रोजी महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कामात अडथळा जाणवला तर तो या दोन दिवसांपुरताच असेल. आपण ठरवून जरी एखादी गोष्ट करायची ठरवली तरीसुद्धा ती वेळेत होणार नाही, पण प्रयत्न सोडू नका.
वृश्चिक : व्यवसायात अनोळख्या व्यक्तीशी व्यवहार करताना हुशारीने वागा. नोकरदार वर्गाने कामात दिरंगाई करून चालणार नाही. खर्च कमी करा. मित्र-मैत्रिणींशी ठरवलेले सहलीचे बेत पुढे ढकला. दिनांक २५ , २६ , २७ हे तीन दिवस अस्वस्थता जाणवू लागेल. आपणही इतरांचे ऐकणे तितकेच गरजेचे असते. या दिवसांत चिडचिड वाढू शकते; पण स्वत:वर नियंत्रण ठेवायला शिका. हे नियंत्रण नाही ठेवले तर स्वत:हून स्वत:चा त्रास वाढवून घ्याल. ‘मी जे म्हणेल तेच बरोबर’ हे सूत्र सध्या बाजूला ठेवा. आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील.
धनू : व्यवसायात आपली आवक बघून जावक ठरवा. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त असताना इतर गोष्टींत लक्ष देता येणार नाही. खर्चाची बाजू सांभाळा. दिनांक २८, २९ हे दोन दिवस बरेच दिवस मनामध्ये जे साठलेले आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल- नेमके हेच ते दोन दिवस असतील. बोलून दाखवल्यानंतरच तुम्हाला शांत झाल्यासारखे वाटेल; पण नंतर त्या गोष्टीचा पश्चात्ताप होईल. चांगल्या गोष्टी होण्यासाठी बरेच दिवस प्रयत्न करावे लागतात. पण एखादी गोष्ट तोडून टाकायची तर त्याला क्षणाचा वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा.
मकर : आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला अधिकार पद मिळेल. आर्थिकदृष्टय़ा प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता निर्माण होईल. सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. सध्या तुमच्या बाबतीत मी म्हणेल तीच पूर्व दिशा असेच होणार आहे. या चांगल्या दिवसांमध्ये नको त्या गोष्टींसाठी वेळ न घालवता जी कामे करावयाची आहेत, त्या कामांसाठी प्रयत्न वाढवा. घेतलेले निर्णय यशस्वी होतील. सध्या तुम्ही इतरांचे काही ऐकून घेणार नाही.
कुंभ : व्यवसायवाढीसाठी जाहिरात माध्यमांचा वापर कराल व त्याचा फायदाही होईल. नोकरदार वर्गाने घेतलेले निर्णय यशस्वी होतील; परंतु कामकाज व्यस्त राहील. आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल. दिनांक २३, २४ रोजी पळापळ करूनही एखादे काम पूर्ण होत नाही. त्या वेळी तुमची चिडचिड वाढणार आहे; पण हे दोन दिवस फारसे अनुकूल नसल्याने असे होऊ शकते. काम उशिरा होणार आहे हे गृहीत धरून चाला. त्यामुळे त्रास होणार नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर ते काम नक्कीच खोळंबणार आहे हे लक्षात घ्या.
मीन : व्यवसायात बदल करण्यापूर्वी विचार करा. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहणे चांगले होईल. आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी आगामी काळासाठी बचतीसाठी नियोजन करा. दिनांक २५, २६, २७ हे दिवस चांगले कसे जातील ते पाहा. म्हणजेच ज्या गोष्टीतून काहीही निष्पन्न होणार नाही अशा गोष्टींचा विचार करणे टाळा. अति विचाराने त्रास वाढू शकतो. संवाद करता करता वादाच्या भोवऱ्यात अडकणार नाही याची काळजी घ्या. कुठेही उग्र रूप धारण करू नका. या दिवसांत तुमच्या हातून एखादी गोष्ट चुकू शकते, नंतर माफी मागण्यात अर्थ राहणार नाही. तोंडातून गेलेला शब्द माघार येणार नाही हे लक्षात ठेवा.