मेष : मनासारख्या गोष्टी घडू लागतील. धनस्थानातून होणारी पौर्णिमा निश्चितच लाभ मिळवून देणारी आहे. ज्या कामासाठी बरेच दिवस चालढकल होत होती ते आता होणार आहे. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायाला चालना मिळेल. व्यवहार रोखठोक होतील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची संधी मिळेल. आर्थिकदृष्टय़ा आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील दगदग कमी होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. घरामध्ये मंगल कार्य घडेल.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ होईल, पण ती फायद्याची राहील. इतरांचे देणे वेळेत फेडू शकाल. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढलेला असेल. खर्च सांभाळून करा. दिनांक ४, ५, ६ असे हे तीन दिवस विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. भावनिक गोष्टीत अडकून चालणार नाही. व्यवहारात्मक गोष्टींना महत्त्व द्या. इतरांचे मत ऐकून घ्या. पण या तीन दिवसांत प्रतिउत्तर करू नका. त्यानंतरचा कालावधी चांगला असेल.
मिथुन : व्यवसायात अनेक मार्गातून येणारे प्रस्ताव घाईगडबडीने स्वीकारू नका. त्यासाठी वेळ घ्या. विचार करून निर्णय घ्या. नोकरदार वर्गाने कामात मदत मिळावी म्हणून इतरांची अपेक्षा करणे योग्य राहणार नाही. आर्थिक बाबतीत खर्च कमी करा. ६ तारखेला दुपारनंतर ७ व ८ असे संपूर्ण दिवस रागाच्या भरात कोणतीही गोष्ट करू नका. कितीही ठरवले ‘आपण भले नि आपले काम भले’ तर तसे होणार नाही. त्यामुळे मनस्ताप होईल.
कर्क : व्यवसायातील खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पाडत असताना व्यवहारात गफलत होणार नाही याची काळजी घ्या.नोकरदार वर्गाचे कामकाज सफल होईल. अनावश्यक गोष्टींची खरेदी टाळा. समाजमाध्यमांपासून दूर राहा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्या.आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा. दिनांक ९, १० असे हे दोन दिवस विनाकारण एखाद्या गोष्टीची चिंता मनाला लावून घेऊ नका. हे दोन दिवस फक्त सकारात्मक वाटणार नाहीत. पण त्यानंतरचा कालावधी हा चांगला असेल.
सिंह : व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणीवर मात करता येईल. तांत्रिक अडचणी कमी होतील. कामातील वेळ वाचेल. नोकरदार वर्गाच्या मागण्या वरिष्ठांना मान्य कराव्या लागतील. वारंवार निर्माण होणारे पैशाचे प्रश्न मार्गी लागतील. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्र ग्रहाचे भ्रमण होत आहे. सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी शुभदायक राहील. याच गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करू शकता. या कालावधीत आपले मत इतरांना पटणारे असेल, त्यामुळे समोरून मिळालेला प्रतिसाद उत्तम राहील. याचा फायदा आगामी काळासाठी होईल.
कन्या : व्यवसायात नेहमीपेक्षा सध्याची परिस्थिती सुधारलेली असेल. मात्र इतरांवर अवलंबून कोणतीही गोष्ट करू नका. पैशांचे व्यवहार रोखठोक करा. राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे काम पार पाडावे लागेल. कुटुंबातील सदस्यांचा आदर करा. दिनांक ४, ५ आणि ६ अशा या तीन दिवसांच्या कालावधीत ज्या गोष्टीपासून त्रास होणार आहे, अशा गोष्टीच्या आहारी न गेलेले चांगले. सहज एखाद्याला चांगली गोष्ट सांगायला गेलात तरी त्या व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळणार नाही. याचा त्रास करून घेण्यापेक्षा हे तीन दिवस कामात व्यस्त राहिलेले चांगले. या तीन दिवसांनंतरचा कालावधी चांगला असेल.
तूळ : मागील काही दिवसांत व्यवसायासंदर्भात जो अनुभव आलेला आहे तो विसरून चालणार नाही. व्यावहारिक गोष्टींना प्राधान्य द्या. खरेदी विक्रीचा व्यवहार जपून करा. आर्थिक बाबतीत बचत करणे इष्ट राहील. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट द्याल. ६ तारखेला दुपारनंतर ७ व ८ असे संपूर्ण दिवस सतर्क राहून काम करणे योग्य राहील. इतरांच्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. कोणाचे बरोबर कोणाचे चुकीचे याबद्दल तुमचे मत व्यक्त करू नका. जिथे वादविवादाचा प्रसंग असेल अशा ठिकाणी मध्यस्थी करायला जाऊ नका.
वृश्चिक : वर्तमान परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करा. जे आहे आणि जसे आहे तसे स्वीकारा. कोणत्याही गोष्टीचा मोह करून चालणार नाही. इतरांचे मत ऐकून घेतले तरीही त्रासाचे वाटणार आणि कोणाला सल्ला दिला तरीही त्रासाचेच वाटणार आहे. त्यापेक्षा शांत राहिलेले सर्वात उत्तम असेल. व्यावसायिकदृष्टय़ा मोठे धाडस टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा
धनू : भावनिक होऊन नको ते धाडसी निर्णय घेऊ नका. व्यवसायातून मिळणारा नफा चांगला असला तरी खर्चही तेवढाच असेल. नोकरदार वर्गाला काम एके काम असेच वेळापत्रक असेल. इतर कामासाठी फारसा वेळ मिळणार नाही. आर्थिकदृष्टय़ा आवक बघूनच खरेदीचे स्वप्न रंगवा. मैत्रीचे नात्यात रूपांतर करू नका. ६ तारखेला दुपारनंतर ७ व ८ असे संपूर्ण दिवस या दिवसात रागाचा पारा चढणार आहे. रागाच्या भरात गेलेले शब्द पुन्हा माघारी येणार नाहीत. त्यासाठी परत मनस्ताप करत बसण्याची वेळ येईल. ही वेळ येणार नाही याची काळजी घ्या.
मकर : व्यवसायिकदृष्टय़ा चढ-उतार असला तरीसुद्धा फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे नियम पटणारे नसले तरीसुद्धा वरिष्ठांच्या नियमानेच काम करावे लागेल. राजकीय क्षेत्रात उत्साह वाटणार नाही. मित्रांसोबत संवाद साधताना जुने विषय उकरून काढू नका. दिनांक ९, १० असे दोन दिवस नियोजनानुसार कोणतेच काम होणार नाही. त्यात बदल होत राहतील. त्यामुळे पळापळ होईल. पण तरीसुद्धा नियोजनानुसार हालचाली सुरू ठेवा. एक घाव दोन तुकडे करणे त्रासाचे होईल. शांततेने सर्व काही करा.
कुंभ : प्रलंबित कामांना गती मिळेल. आगामी काळासाठी नियोजन करावयाचे असल्यास सध्या हालचाली वाढवाव्या लागतील. पौर्णिमा कालावधी शुभदायक असेल. भागीदारी व्यवसायिकांनी हिशेबाच्या नोंदी ठेवणे आवश्यक राहील. आवक-जावक उत्तम राहील. नोकरदार वर्गाला सोपवलेली जबाबदारी वेळेत पार पाडावी लागेल. आर्थिक येणे वसूल होईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेपेक्षा कामाकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहात सर्व दिवस चांगले असतील. मनामध्ये कितीही उत्साह असला तरी कामे वेळेवर होत नव्हती, त्यामुळे हा उत्साह कमी व्हायचा. सध्या मार्गातील अडथळा कमी होणार आहे.
मीन : मागील काही दिवसांपेक्षा सध्याचे दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्टय़ा कला कौशल्याला वाव मिळेल. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होईल. व्यावसायिक वाढ झपाटय़ाने होईल. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च कमी होतील. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. भावंडांशी वाद होणाऱ्या गोष्टींवर चर्चा करू नका.या आठवडय़ात काही गोष्टींची अपेक्षा नसतानासुद्धा ही अनपेक्षित लाभ मिळणार आहे. एखादी गोष्ट मनासारखी होणार नाही असे तुम्ही तुमच्या मनावर बिंबवले आहे. हा स्वत:शीच असणारा गैरसमज आता दूर होईल.
















