मेष : व्यावसायिकदृष्टय़ा भरभराटीचे वातावरण निर्माण होईल. अनेक मार्गातून आलेले प्रस्ताव लाभदायक ठरतील. व्यवहार पूर्ण होतील. नोकरदार वर्गाची कामे करण्याची मानसिकता चांगली राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. दिनांक ९, १० हे संपूर्ण दिवस व ११ तारखेला दुपापर्यंत अशा या कालावधीत स्वत:च्या अडचणी वाढू नयेत असे वाटत असेल तर कोणाच्या वाटय़ाला जाऊ नका. प्रत्येक गोष्टीत सुवर्णमध्य साधा. तरच हे दिवस चांगले जातील. बाकी दिवसांचा कालावधीही चांगला जाईल. मोह टाळा. धंद्यात वाढ होईल. नोकरीत आशा वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच समोर येतील.
वृषभ : व्यवसायाला चालना मिळेल. इतरांची देणी वेळेत फेडाल. दलाली करणाऱ्या व्यावसायिकांना फायद्याचे प्रमाण चांगले राहील. आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल. ११ तारखेला दुपारनंतर १२ व १३ तारखेला संपूर्ण दिवस या कालावधीत मागील काही गोष्टी उगाळत बसू नका. स्वत:हून एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न टाळा, त्यामुळे कारण नसताना मनस्ताप होऊ शकतो. शांत डोके ठेवून काम करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे करण्याचा प्रयत्न करा. वक्तव्य करताना कायदा पाळा. धंद्यात काम जास्त करा. कमी बोला. नोकरीत अचानक वरिष्ठांचा विचार बदलेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तत्परता ठेवा.
मिथुन : व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करा. उधारीचा व्यवहार टाळा. नोकरदारवर्गाने वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आर्थिकदृष्टय़ा नियोजन करा. षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. चांगल्या गोष्टी करण्यासाठी चांगली वेळ यावी लागते. म्हणजेच सध्याचा कालावधी अनुकूल नाही हे लक्षात ठेवा. कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. विचारपूर्वक घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. सर्व दिवसांच्या कालावधीत काळजी घ्या. गैरसमज पसरवतील. रागावर नियंत्रण ठेवा. दुखापत टाळा. मोह आवरा. नोकरीत प्रभाव वाढवण्यासाठी मेहनत घ्यवी लागेल.
कर्क : व्यावसायिकदृष्टय़ा प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा. इतरांवर अवलंबून कोणतेही काम करू नका.नोकरदार वर्गाचे कामामध्ये नियोजन बिघडणारे आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. खर्च आटोक्यात ठेवा. ११ तारखेला दुपारनंतर १२, १३ संपूर्ण दिवस जे काही करायचे आहे ते होणार नाही. त्यापेक्षा न केलेले चांगले. सध्या ही वेळ पुढे ढकला. या कालावधीमध्ये विचार करून निर्णय घ्या. कोणतीही गोष्ट स्वत: पाहिल्याशिवाय त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. इतरांनी सांगितले म्हणून विश्वास ठेवला तर त्याचे परिणाम तुम्हाला त्रासदायक राहतील. क्षुल्लक कारणाने डोक्यात राग घालून घेऊ नका. नोकरीत कामाचे कौतुक होईल. बढती मिळेल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. वसुली करा.
सिंह : व्यावसायिकदृष्टय़ा कष्ट वाढवावे लागतील. मात्र या परिश्रमाचे फळ लाभदायक राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कामाच्या बाबतीत कौतुक ऐकावयास मिळेल. आर्थिक नियोजन करा. १३ तारखेला दुपारनंतर व दिनांक १४, १५ रोजीचे दिवस कितीही प्रयत्न केला तरी वेळेत कामे होणार नाहीत. त्यामुळे चिडचिड वाढू शकते. भावनिक गोष्टींत अडकू नका. बोलण्याच्या भरात नको ती जबाबदारी घेऊ नका. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होईल हे विसरू नका. कोणतीही अपेक्षा मर्यादित ठेवा. विरोधक मैत्रीची भाषा करतील. नवे संबंध प्रस्थापित होतील. नोकरीत उतावळेपणा नको. नम्रता ठेवा. धंद्यात वाढ होईल. करार करण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल.
कन्या : व्यवसायातील दिवस भरभराटीचे असतील. कला-कौशल्याला वाव मिळेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. चंद्र ग्रहाची अनुकूलता उत्तम राहील. सर्व दिवसांचा कालावधी चांगला जाईल. चंचल वृत्ती कमी झाल्याने कोणत्याही कामाची सुरुवात करणे सोपे होईल. तुम्ही तुमचे जे ध्येय ठरवलेले आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्या सध्या येणार नाहीत. संधीचे सोने करा. ओळखीचा फायदा करून घ्या. आठवडय़ाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. तत्परता दाखवा. गोड बोला. महत्त्व वाढेल. नोकरीत कमी बोला. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांकडून सन्मान मिळेल.
तूळ : व्यावसायिकदृष्टय़ा ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळेल. व्यवसायात मागील काही दिवसांपेक्षा सध्याचे दिवस चांगले आहेत असेच वाटेल. नोकरदार वर्गाला संधी प्राप्त होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. समाजसेवा करताना थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांची ऊठबस करावी लागेल. सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे सकारात्मक बदल घडेल. वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे मनामध्ये जे एक प्रकारचे दडपण होते ते दडपण आता येणार नाही. हाती घेतलेले काम पूर्णत्वाला जाईल. कामातील गती वाढेल. भावनेच्या भरात कोणतेही आश्वासन देऊ नका. विरोधक तुमच्यावर नजर ठेऊन आहेत. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची लाकप्रियता इतरांना खपणार नाही.
वृश्चिक : व्यवसायात धावपळ कमी झाल्याने कामातील उत्साह टिकून राहील. व्यावसायिकदृष्टय़ा अनेक क्षेत्रांत सरस राहाल. नोकरदार वर्गाचे कामकाज कमी व्यापाचे झाल्याने कामातील गती वाढेल. आर्थिकदृष्टय़ा प्रगती होईल. सध्या शुभ ग्रहांची साथ चांगली असल्यामुळे उद्दिष्ट सफल होणार आहे. जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मागील गोष्टींचा विसर पडतो असेच हे वातावरण आहे. तुमच्या कल्पना नुसत्या कल्पनाच होत्या. त्या प्रत्यक्षात उतरवणे शक्य नव्हते. त्या आता शक्य होणार आहेत. आठवडय़ाच्या सुरूवातीला अतिमहत्त्वाची कामे करा. सहकारी, मित्र मदत करतील. कायदा पाळा. नम्र रहा. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल.
धनू : व्यवसायात फार मोठे धाडस करून चालणार नाही. सध्या मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिकदृष्टय़ा तोंडी व्यवहार टाळा. दिनांक ९, १० हे संपूर्ण दिवस व ११ तारखेला दुपापर्यंत असा अडीच दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नसेल. नेमके याच दिवशी जी गोष्ट करायची नाही तीच करावीशी वाटेल. म्हणजेच जिथे बोलल्यामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशा ठिकाणी तुम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे दुरावा येऊ शकतो. धंद्यात गोड बोला पण फसू नका. फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात राग वाढवणाऱया घटनांना धैर्याने सामोरे जाल.
मकर : व्यावसायिकदृष्टय़ा चालढकल न करता वेळेत कामे पूर्ण करा. त्यामुळे फायदाही वेळेत मिळेल. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले. आर्थिक उलाढाली वाढतील. मात्र बचत करणे इष्ट राहील. समाजसेवा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा. ११ तारखेला दुपारनंतर व दिनांक १२, १३ हे संपूर्ण दिवस असे आहेत की कारण नसताना निराशा वाटू शकते. ही निराशा दूर करावयाची असेल तर स्वत:चा विचार करा. होऊन गेलेल्या गोष्टीवर फारसा विचार करू नका. हा विचार न करण्याने बरेच काही साध्य करता येईल. नोकरीत सहकारी निष्कारण वाद करतील. धंद्यात गोड बोला पण फसू नका. फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात राग वाढवणाऱया घटनांना धैर्याने सामोरे जाल.
कुंभ : व्यवसायात सध्या उत्पादनात झपाटय़ाने वाढ झाल्यामुळे धावपळ वाढेल. नोकरदार वर्गाने कामात गुंतून राहिलेले चांगले राहील. वायफळ खर्च टाळा. १३ तारखेला दुपारनंतर १४ व १५ हे संपूर्ण दिवस ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे सूत्र लागू होणार आहे. नुसतेच स्वप्न बघून चालणार नाही, प्रत्यक्षात कृती करणे महत्त्वाचे राहील. पण ही कृती करताना वेळ-काळाचे भान ठेवा. अंदाज वर्तवून कोणतीही गोष्ट करणे त्रासाचे ठरेल. इतरांचे मत जाणून घ्या. पण त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. तुमच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. नवे परिचय उत्साहवर्धक, प्रेरणादायी ठरतील. कायदा मोडू नका. नोकरीधंद्यात नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नियोजनबद्ध रूपरेषा तयार करून कार्य करा.
मीन : या सप्ताहात शुभवार्ता कळेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यास प्रयत्न करायला हरकत नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे स्पष्ट बोलणे आवडणार नाही. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. सर्वच दिवसांचा कालावधी चांगला राहील. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे चंद्राचे भ्रमण म्हणजे जणू काही दुधात साखर. मागील काही दिवस ताणतणावाचे गेले असले तरी सध्या हा ताणतणाव राहणार नाही. त्यामुळे कोणतेही काम करायला उत्साह वाटेल. प्रकृती सुधारेल. नविन परिचय उत्साहाचा व फायद्याचा ठरेल. तुमच्या क्षेत्रात चांगले यश मिळेल. साडेसाती सुरू आहे. नोकरीधंद्यात प्रगती होईल. कठीण प्रश्न सुटतील.