मेष :-
मंगळ-शुक्र युतियोगाची पार्श्वभूमी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून लाभ देणारी. तरुणांना बलवत्तर विवाहयोग. नोकरीच्या संधींवर लक्ष ठेवा. सप्ताहाची सुरुवात वैवाहिक जीवनातून सुवार्तांची. शुक्रवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सुंदर गाठीभेटींचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळावा.
वृषभ :-
कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र युतियोगाचं पॅकेज व्यावसायिक प्राप्तीत वाढ करेल. परिचयोत्तर विवाहयोग. आजचा रविवार छान करमणुकीचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट वैयक्तिक समारंभातून झगमगाटी ठरेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून नोकरीचे योग. मित्रांकडून लाभ.
मिथुन :-
सप्ताह अतिशय गतिमानच राहील, भाग्यातील गुरूची साथ राहीलच. आजचा रविवार गाठीभेटींतून महत्त्वाचाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून आनंद.
कर्क :-
मंगळ-शुक्र युतियोगाची पार्श्वभूमी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनं यशस्वी करणारी. घरात विशिष्ट हृद्य समारंभ होतील. येता गुरुवार मोठ्या सुवार्तांचा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार खरेदीत फसवणुकीचा. शनिवारी पुत्रचिंता घालवेल.
सिंह :-
सप्ताह अतिशय गतिमान राहील. मात्र, करारमदार करताना कायदेशीर बाजू जपा. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. काहींना नव्या ओळखीतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून प्रकाशात आणणारा.
कन्या :-
सप्ताहातील सुवार्तांतून चर्चेत राहणारी रास राहील. उत्सव-समारंभातून छान मिरवाल. उत्तरा व्यक्ती वैभवसंपन्न होतील. ता. १० व ११ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत भाव खाऊन जातील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी थट्टामस्करी टाळावी. मंगळवार बेरंगाचा होऊ शकतो.
तूळ :-
मंगळ-शुक्र युतियोगाच्या पार्श्वभूमीवर काही उत्तम लाभ होतील. विशिष्ट मार्केटिंग यशस्वी होईल. रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती इतरांवर छाप पाडतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे परिचयोत्तर विवाह. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कामांतून यश देणारा. उच्चपदस्थ व्यक्तींकडून सहकार्य. तरुणांचा परदेशी भाग्योदय.
वृश्चिक :-
मंगळ-शुक्र युतियोगाच्या पार्श्वभूमीचा हक्काने लाभ घेणारी रास. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ अपेक्षित आहेत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखींतून लाभ होतील. वास्तूविषयक व्यवहार मार्गी लागतील. ता. ९ व १० हे दिवस जाहिरात माध्यमातून यश देतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभाचा.
धनू :-
अतिशय ऊर्जासंपन्न असा सप्ताह राहील. तरुण-तरुणींना हा सप्ताह कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून छानच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या व्यावसायिक उपक्रमांतून उत्तम प्राप्ती होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींस ता. ११ व १२ हे दिवस मोठ्या उलाढालींचे. बलवत्तर विवाहयोग.
मकर :-
राशीतील मंगळ-शुक्र युतियोगाचं अतिशय गुलाबी वातावरण राहील. सप्ताहात तरुण-तरुणींचं होले होले होईल. आजचा रविवार एकूणच सप्ताहाचं पॅकेज घोषित करेल; और क्या! उत्तराषाढा व्यक्ती प्रकाशात येतील. श्रवण नक्षत्रास येता गुरुवार संकटविमोचनाचा, शनिवार पुत्रोत्कर्षाचा. उंची वस्तूंची खरेदी कराल.
कुंभ :-
सप्ताह घरगुती सुवार्तांतून मोठ्या मौजमजेचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीतील घटनांतून खूष राहतील. पती वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष होईल. सप्ताहात पर्यटनाचे योग. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० ते १२ हे दिवस मोठ्या आनंदाचे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे परिचयोत्तर विवाह.
मीन :-
सप्ताह निश्चितपणे तरुण-तरुणींमध्ये जान आणणारा. सतत उत्सव-समारंभातून मिरवाल. उत्तराभाद्रपदा व्यक्तींचा व्यावसायिक शुभारंभ दणक्यात होईल. ता. १० व ११ हे दिवस अनेक प्रकारांतून झगमगाट करवतील. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. कलाकारांचे भाग्योदय. रेवती नक्षत्रास परदेशी व्यापारात लाभ.