अमरावती (वृत्तसंस्था) नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी धरणावर दोन मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना सोमवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रेशीव राजेंद्र वांगे (१६) रा. प्रिया टाउनशिप, देशमुख लॉन परिसर असे मृतकाचे नाव आहे. रेशीव हा सोमवारी दुपारी मित्र श्रीजीत किशोर काळबांडे (१६) रा. कठोरा व दीप नवले (१६) रा. पोदार शाळेजवळ यांच्यासोबत वाळकी धरणावर पोहायला गेला होता. तिनही मित्रांनी धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, रेशीवला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही बाब त्याचे मित्र श्रीजीत व दीपच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेशीवला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने पाण्याबाहेर पडून नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने रेशीवचा शोध घेऊन त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.