मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या दोन गटांमुळे पक्षाची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याला फटका बसला आहे. दसरा मेळावा शिंदे घेणार की ठाकरे हा वाद थेट कोर्टात गेला आणि कोर्टाने शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा ठाकरेंच्या पारड्यात टाकला आहे. पण आता सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार आहेत.
मुंबई हायकोर्टाने ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला तरीही शिंदे गटसुद्धा दसरा मेळावा घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसीतल्या एमएमआरडीएच्या मैदानात शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. आता या तयारीच्या मेळाव्यालाही सुरुवात झाली आहे. सेनेच्या राजकीय इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. एकाच दिवशी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहे.
शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमधल्या एमएमआरडीए मैदानात तयारी सुरू कऱण्यात आली आहे. चार जेसीबी लावून मैदानाची साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच जमीन समांतर करण्याची तयारीही सुरू आहे. आता या शिवसेनेच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे काय बोलणार, कोणते आरोप प्रत्यारोप होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.