मुंबई (वृत्तसंस्था) आज गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं, याची सर्वांना उत्सुकता लागून होती, याविषयी आता शरद पवार यांनी देशातील साखर उत्पादन आणि सहकार या विषयावर भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘सहकारी साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय महासंघांचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांच्यासोबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सहकार क्षेत्रातील अडचणींबाबत चर्चा झाली,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ‘देशाचे पहिले सहकारमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबाबत मी अमित शहा यांचे अभिनंदन केलं. या भेटीत आम्ही देशातील सध्याची साखरेची परिस्थिती आणि जास्त साखर उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्या यावर चर्चा केली,’ असंही पवार म्हणाले.
‘साखरेसाठी न्यूनतम समर्थन मूल्य आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट स्थापन करण्याची परवानगी यासारख्या दोन सर्वात गंभीर समस्या आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्या. आम्हाला आशा आहे की सहकार मंत्री या समस्यांवर अनुकूलपणे विचार करतील आणि लवकरात लवकर त्या सोडवतील,’ अशी अपेक्षा शरद पवार यांनी या भेटीनंतर व्यक्त केली आहे.