मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया काय होती यासंदर्भात न्यायालयामध्ये आर्यनची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी माहिती दिली आहे. शाहरुखने सर्व काम सोडून या प्रकरणात लक्ष घातलं होतं. इतकच नाही तर आर्यनची बाजू मांडणाऱ्या टीमला मदत करण्यासाठी शाहरुखने स्वत: काही नोट्स बनवल्या असल्याचा खुलासा रोहतगी यांनी केला.
आर्यनला जामीन मिळाल्याचं समजताच शाहरुखच्या डोळ्यात आनंदाश्रू होते असं रोहतगी यांनी म्हटलं आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून तो फार फार चिंतेत होता. मी जेव्हा त्याला भेटायचो तेव्हा तो चिंतेतच असायचा. तो जेवणही व्यवस्थित घेत असावा की नाही याबद्दल शंका आहे. तो केवळ कॉफी प्यायचा. त्याला फार चिंता वाटत होती. मात्र आता मी त्याला भेटलो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्याचे भाव दिसून आले. एका बापाच्या चेहऱ्यावरील ते भाव होते,” असं रोहतगी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
“दूर्देवाने कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. त्यामुळे प्रकरण उच्च न्यायालयात आलं आणि यात जवळजवळ महिना गेला. त्याचे पालक फारच चिंतेत होते. त्यामुळेच ते या प्रकरणबद्दल बारीक सारीक माहिती जाणून घेत होते. शाहरुखने तर सर्व काम सोडून या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तो यासंदर्भात बोलण्यासाठी कधीही उपलब्ध होता. इतकच नाही तर आर्यनची बाजू मांडणाऱ्या टीमला मदत करण्यासाठी शाहरुखने स्वत: काही नोट्स (मुद्द्यांची यादी) बनवल्या,” असंही रोहतगी म्हणाले.
















