अमळनेर (प्रतिनिधी) सोशल मीडियातील ‘माझं गांव माझं अमळनेर’ या मागिल सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सर्वाधिक सक्रिय अशा व्हाट्सअप्प ग्रुप ने कोविडच्या आजच्या गंभीर साथीत अमळनेरकरांच्यादृष्टीने महत्वपूर्ण व मुख्य अशा ग्रामिण रुग्णालयाला व रुग्णालयासमोरील कोविड सेंटरला अत्यंत आवश्यकता असलेले व सदोदित उपयोगी ठरेल असे ३ लक्ष ८० हजार रु किंमतीचे उच्च दाब क्षमतेचे जनरेटर आज भेट दिले.
सदर जनरेटरचे लोकार्पण प्रसंगी अमळनेरच्या प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी ग्रुप च्या समाजोपयोगी व उत्स्फूर्त कार्याचे कौतुक केले. यावेळी या लोकार्पण कार्यक्रमासाठी तहसीलदार मिलिंद वाघ, न.प.च्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, नर्मदा फाउंडेशनचे डॉ. संदिप जोशी, डॉ. शरद बाविस्कर, व्हाट्सअप्प ग्रुपचे अँडमिन सुनिल भामरे, यांचेसह ग्रुपमधील प्रमुख वर्गणीदार आणि विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवर ग्रुप सदस्य उपस्थित होते. शहरातील ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. ताडे यांनी, ‘ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत दिलेल्या जनरेटर देणगीमुळे संपुर्ण रुग्णालयाला, रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून रुग्णालयाच्या सेवा अधिक प्रभावीपणे देता येईल!’असे सांगितले. तसेच जळगाव जिल्हा चिकित्सक डाॕ. नागोजीराव चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे भेट दिली तर नविन जनरेटर रुग्णालयास भेट मिळाल्याबद्दल माझं गाव माझं अमळनेर गृपचे आभार व्यक्त केले. अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनीही भेट दिली.
यावेळी आमच्या या व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या जनरेटरचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित मान्यवर अधिकारी व पदाधिकारी तसेच देणगीदार सभासदांचे आभार मानतांना मोठे समाधान वाटले.