मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.
राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा आयोगाकडून न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने आयोगाला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रम बदल करण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे.
राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला. त्यामुळे आयोगाकडून आता जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार केला जाऊ शकतो. राज्यात मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे तिथल्या निवडणुका आयोग घेणार नाही, अशी शक्यता आहे.
त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस कोसळतो. अनेक ठिकाणी पुरस्थिती असते. तिथेही निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ व मराठवाड्यात तुलनेने पाऊस कमी असतो. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील जिल्ह्यांमध्ये निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे. आता आयोग निवडणुकांचा कार्यक्रम कसा तयार करणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
















