बुलढाणा (वृत्तसंस्था) हिस्सेवाटणीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना एका तालाठ्यात अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. किशोर कऱ्हाळे, असे संशयिताचे नाव आहे.
मोताळा तलाठी कार्यालयात शुक्रवारी (१ डिसेंबर) ही कारवाई करण्यात आली. एका तहसील कार्यालयात शेतकऱ्याने शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीचे प्रकरण दाखल केले होते. हे प्रकरण मंजूर करण्यासाठी येथील तलाठी किशोर शांताराम कऱ्हाळे याने शेतकऱ्याला ३० हजार रुपयांची लाच मागितली.
दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. अमरावती ‘एसीबी’च्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. तलाठी किशोर कन्हाळे याने कार्यालयात ३० हजार रुपये स्वीकारताच त्याला पथकाने रंगेहात पकडले.
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, युवराज राठोड, विनोदकुमार धुळे, स्वप्निल क्षीरसागर, राहुल वंजारी यांनी ही कारवाई केली.