मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. बंडखोरांसह एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 35 मंत्री असतील. त्यापैकी 12 बंडखोर आमदारांना मंत्री केलं जाऊ शकतं, तर 24 चेहऱ्यांना भाजपच्या कोट्यातून संधी मिळण्याची चर्चा आहे.
भाजपच्या कोट्यातून कोणाची वर्णी?
भाजपच्या कोट्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर आणि माधुरी मिसाळ यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, राहुल कुल आणि गोपीचंद पडळकर यांची नावं देखील चर्चेत आहेत.
शिंदेंच्या गोटातून कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?
‘माविआ’ सरकारच्या काळात बंडखोर शिंदे गटातील 9 मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली होती. त्या सर्व मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यातील 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री करण्यात येणार आहेत. शिंदे गटातील अन्य संभाव्य मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, दादा भुसे, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संजय शिरदत, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश आबिडकर यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.